पावस : ताैउते चक्रीवादळाच्या तडाख्याने रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे वरचा वठार येथे विजेची तार तुटून दोन बकऱ्यांचा मृत्यू हाेऊन १४ हजारांचे नुकसान झाले आहे़
कोळंबे वरचा वठार येथे विजेची तार तुटून पडलेल्या ठिकाणाहून कीर हे आपल्या १४ बकऱ्या घेऊन जात हाेते़ त्याचवेळी नारळाची सावळ विद्युत वाहिनीवर पडून तार तुटून खाली पडली़ त्यामध्ये दोन बकऱ्यांचा शॉक लागून मृत्यू झाला़. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ़ मोहितकुमार गर्ग व पूर्णगड सागरी पोलीस स्थानकाचे पाेलीस निरीक्षक सुरेश गावित यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली़ पोलीस काॅन्स्टेबल ललित देऊसकर यांनी घटनेचा पंचनामा केला.
त्याचबराेबर वाऱ्यामुळे पावस, मेर्वी, पूर्णगड, गावखडी, गणेशगुळे येथे झाडांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली आहे़ मात्र, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. पावसमध्ये स्वामी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन ठिकाणी झाडे पडली होती. तर मावळंगे रस्त्यावरही झाड पडले होते़ पूर्णगड सागरी पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने झाडे बाजूला करून रस्ता रहदारीसाठी मोकळा केला. तसेच गावखडी सुरूबन येथे एक सुरूचे झाड रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती़ गावखडी येथील ग्रामस्थ व पोलिसांनी झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.