दापोली : शहरातील नवानगर येथे हळदीच्या कार्यक्रमाचा डीजे लावण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. चाकू, काठी, दगड, लोखंडी पायपाने मारहाण केल्याने ११ जण जखमी झाले आहेत. दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने दापोली पोलिसांनी ३५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना रविवारी (दि.२४) रात्री १०.३० वाजता घडली.याबाबतची फिर्याद अशोक माने (४२, रा. दापोली) यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या घराशेजारी हळदीचा कार्यक्रम होता. याचवेळी त्यांच्या नातेवाइकांचे कोल्हापूर येथे निधन झाल्यामुळे ते कोल्हापूरला जात होते. दरम्यान, तिथे पोलीस आले आणि त्यांनी डीजे बंद करायला लावला. माने यांच्यामुळेच पोलिसांनी डीजे बंद करायला लावला, असा गैरसमज करून घेत एकूण २० जणांनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. अशोक माने यांना मारहाण होत असल्याचे पाहून त्यांचे भाऊ शिवाजी माने व भाचा चेतन नलावडे हे पुढे सरसावले. त्यांनाही मारहाण करण्यात आली.मिथुन कुऱ्हाडे, सूरज, कमल कुऱ्हाडे, सचिन कळकुटगी, मारुती कळकुटगी, संतोष कळकुटगी, चेतन नलावडे, रमेश नलावडे, हरिश्चंद्र नलावडे, प्रणव नलावडे, रूद्र कुऱ्हाडे, समर्थ कुऱ्हाडे, मनीषा कळकुटगी, सुनील माने, परशुराम माने, महेंद्र माने, नीला माने, यल्लका कळकुटगी, साहिल नलावडे, अनिल नलावडे (सर्व रा. नवानगर, दापोली) हे २० जण कोयती, लोखंडी पाईप, काठी, दगड घेऊन चाल करून आले. त्यांनी शिवाजी माने, चेतन नलावडे, शांता माने, केतन नलावडे, बंडू कळकुटगी अशा ५ जणांना जबर मारहाण केली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर दुसऱ्या बाजूने चेतन नलावडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांच्या बहिणीचे लग्न सोमवारी असल्यामुळे रविवारी हळदीच्या कार्यक्रमात अशोक माने, शिवाजी माने, अनाप्पा माने, लोकेश माने, दिलीप माने, सतीश माने, केतन नलावडे, चेतन नलावडे, अमोल माने, बंडू कलकुटकी, जयश्री माने, अनिता माने, सौरभ माने, अथर्व माने यांनी चाकू, काठी, दगड, लोखंडी पायपाने मारहाण केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दापोलीत डीजे बंद करण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी, ११ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 6:04 PM