रत्नागिरी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंदाेबस्तासाठी असलेल्या पाेलिसांसमाेरच परप्रांतीय दाेन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. रत्नागिरी शहरातील माळनाका येथील शासकीय विश्रामगृहाबाहेर झालेल्या या हाणामारीमुळे पाेलिसांची धावपळ उडाली. या मारहाणीत तीनजण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी रत्नागिरी दाैऱ्यावर येत आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील माळनाका येथील शासकीय विश्रामगृह येथेही पाेलिस बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे. याच ठिकाणी दुपारी काही परप्रांतीय नागरिकांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. काही क्षणातच दाेन गटातील नागरिकांनी एकमेकांना काठी व अन्य साहित्याने मारहाण केली. या मारहाणीत तीनजण जखमी झाले असून, एकाला डाेक्याला दुखापत झाली आहे.
माळनाका येथे बंदाेबस्तासाठी असणाऱ्या पाेलिसांनी हस्तक्षेप करत हाणामारी राेखली. यातील जखमींना रिक्षातून जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या पाेलिसांच्या अंगावरही रक्ताचे शिंताेडे उडाले. पाेलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. या मारहाणीनंतर या भागात बघ्यांची माेठी गर्दी जमली हाेती. मात्र, हा वाद नेमका कशामुळे झाला हे कळू शकलेले नाही.