रत्नागिरी : वादळी वाऱ्यासह खवळलेल्या समुद्रामुळे मच्छिमारासाठी खोल समुद्रात गेलेल्या मुंबई व राज्यातील सुमारे २०० यांत्रिकी नौकांनी तवसाळ (ता़ गुहागर) बंदराचा आधार घेतला आहे. त्या नौका नांगरावर ठेवण्यात आल्या आहेत़जिल्ह्यात गेले पाच दिवस पावसाने कहर केला असून, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. समुद्र खवळल्याने मोठ्या लाटा उसळत असल्याने खोल समुद्रातील मासेमारीला जाणे बहुतांश मच्छिमारांनी बंद केले आहे़ शासनाने धोक्याचा इशारा दिलेला असतानाही वरवडे येथे समुद्रात गेलेली यांत्रिकी नौका बुडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले़ मात्र, खलासी सुदैवाने बचावले़ वादळी वारा आणि मुसळधार पावसाशी सामना करत हे खलासी जीव मुठीत धरून किनाऱ्यावर परतले. या घटनेमुळे मच्छिमार भयभीत झाले आहेत. पावसाचा तसेच वाऱ्याचा आवेश किनारपट्टी भागात अद्याप कमी झालेला नसल्याने मच्छिमारी अजूनही बंद आहे.पुढील २४ तासात १२ सेंटीमीटरने पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता असून, त्यामुळे समुद्रात वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. दक्षिण-नैऋत्य दिशेकडे तासी ४० ते ४५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत मच्छिमारांनी मच्छिमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे़ त्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून, तशा सूचना मच्छिमारांना देण्यात आल्या आहेत़ त्यामुळे मच्छिमारांनीही खोल समुद्रात जाणे टाळले आहे़मुंबई व राज्यातील अन्य भागात पर्ससीन नेटने मासेमारी करणाऱ्या नौका १० ते १५ दिवसांसाठी खोल समुद्रात मासेमारीसाठी जातात़ त्यामुळे गेले दोन दिवस खोल समुद्रात उसळलेल्या उंच लाटांमुळे या यांत्रिकी नौकांनी परत न जाता जवळ असलेल्या तवसाळ बंदराचा आधार घेतला आहे़ त्यामुळे सुमारे २०० नौका तवसाळ बंदरात विसावल्या आहेत़ आता हे बंदर नौकांनी भरले आहे़ समुद्र शांत होईपर्यंत या नौकांना आता येथेच थांबावे लागणार आहे़दरम्यान, गेल्या काही दिवसात मच्छिमारीवर मोठे संकट आले आहे. १५ आॅगस्टपासून मच्छिमारी सुरू झाली असली तरी त्यानंतर वारंवार वातावरणात होणारा बदल आणि पावसाने केलेला कहर यामुळे बहुतांश दिवस मच्छिमार आपल्या व्यवसायाला मुकला आहे.भाद्रपद महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार बरसायला सुरूवात केली आहे. समुद्री भागात वाऱ्याचा वेगही जास्त असल्याने अनेक मच्छिमारांनी समुद्रापासून चार हात लांब राहाणे पसंत केले. ज्यांनी समुद्रात नौका ढकलल्या होत्या, त्यांनाही समुद्री वाऱ्याच्या वेगाने पुन्हा किनारी परतावे लागले. गेल्या पंधरा दिवसांत बंद असलेल्या मच्छिमारीमुळे मच्छिमारांचे हंगामाच्या सुरूवातीलाच नुकसान झाले आहे. (शहर वार्ताहर)येत्या २४ तासांसाठी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून वादळी वाऱ्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मच्छिमारीच्या परिस्थितीत येत्या दोन दिवसात तरी फारशी काही सुधारणा होणे शक्यच नसल्याचे मच्छिमारांनी सांगितले. त्यामुळे निसर्गावर हवाला ठेवून नौका समुद्रात ढकलणारा मच्छिमार हवालदिल झाला आहे.
तवसाळ बंदरात दोनशे नौका
By admin | Published: September 01, 2014 10:43 PM