रत्नागिरी : मुंबईत एका महिलेचा खून करुन रत्नागिरीत आश्रयाला आलेल्या दोन संशयितांना रत्नागिरी शहर पोलिसांनी रविवारी (३० एप्रिल) ताब्यात घेतले आहे. हे दोघेही संशयित रत्नागिरीतील आंबेशेत परिसरात एका घरात राहत होते. त्यांना आश्रय दिलेल्या घरमालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुंबईत खून करुन दोन आरोपी रत्नागिरीत आल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या टीमने रत्नागिरी शहर पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर रत्नागिरी पोलिस यंत्रणा सतर्क झाली होती. रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी तत्काळ यंत्रणा कामाला लावली. संशयित आरोपींच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली. चौकशीदरम्यान दोन संशयित आंबेशेत येथील एका घरात आश्रयाला आले आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली. हे दोन्ही संशयित परिसरात बिनधास्त वावरत होते. नवीन चेहरे दिसत असल्यामुळे परिसरात चर्चाही सुरू होती. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी करून दोघांनाही ताब्यात घेतले. तसेच या प्रकरणी घर मालकालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. या घरमालकाने दोघांना भाड्याने खोली दिल्याचे पुढे आले आहे. मात्र, ते त्याच गावात का आले, यांचा तपास पोलिस घेत आहेत.
ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक आकाश साळुंखे, प्रवीण बर्गे, अमोल भोसले, गणेश सावंत, विनय मलवाल, आशिष भालेकर यांनी केली.