खेड/आवाशी : मुंबई-गोवा महामार्गावरील दाभिळ नाका येथे स्वीफ्ट डिझायर कार व टँकर यांच्यात झालेल्या धडकेत दोन ठार, तर दोघेजण जखमी झाले. हा अपघात रविवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास झाला. या अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजंूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघातातील मृतांमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीच्या लोटे युनिटचे डायरेक्टर आणि कंपनी व्यवस्थापक गिरीष बर्वे (वय ५०) यांचा समावेश आहे.याप्रकरणी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे, लोटे औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीतील कार्यक्रम उरकून स्वीफ्ट डिझायर ही मोटार कार (एमएच ०२ डीएन ५७०४) या मोटारीने या कंपनीतील चौघेजण मुंबईच्या दिशेने निघाले होते. यावेळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू टँकर (एमएच-४३-बीजी-२५८४)ने समोरून मोटारीला जोरदार धडक दिली.ही धडक इतकी जोरात होती की, कारचा चेंदामेंदा झाला. या अपघातात कंपनीचे लोटे युनिटचे डायरेक्टर आणि कंपनी व्यवस्थापक गिरीष बर्वे (५०) हे जागीच ठार झाले, तर कंपनीचे पर्सनल मॅनेजर विशाल म्हातले (३०) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ चिपळूण येथील लाईफकेअर रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले, परंतु या ठिकाणी उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.कंपनीचे अभियंता राकेश वडाळकर हे गंभीर जखमी असून, लाईफकेअर येथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघात झाल्यानंतर दाभिळ येथील स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेने चिपळूण येथे हलविले. घटनास्थळावर पोलिसांना पोहोचण्यासाठी वेळ गेला. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. कंपनीचे अकौंटंट राजेश जोशी हे या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे या अपघातासंदर्भात अधिक माहिती प्राप्त होऊ शकली नाही.
दाभिळ येथे अपघातात दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 11:08 PM