खेड : मुंबई - गोवा महामार्गावर मौजे खवटी येथील शंकर पार्वती मंदीराजवळ टाटा सुमोने दुचाकीला ठोकरल्याने झालेल्या अपघातात मुरडे-रामवाडी येथील दहा वर्षांच्या बालकासह दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी रात्री आठ वाजता घडला. या अपघातात दुचाकीवरील आणखी एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर डेरवण येथे उपचार सुरु आहे. साहील कृष्णा बंडबे (१०, मुरडे-रामवाडी) व संदेश श्रीधर गोसावी (२५, गिम्हवणे) अशी ठार झालेल्यांची नावे असून, विलास म्हादलेकर (२२, शिरवली, खेड) हा गंभीर जखमी आहे. संदेश गणेशोत्सवासाठी दिवा (ठाणे) येथून आपल्या ताब्यातील बजाज पल्सर (एमएच ०४जीए ४४३२) वरुन साहील व विकास यांना घेऊन खेडकडे येत होता. तो खवटी येथे आला असता मुंबईकडे जाणाऱ्या किशोर पद्माकर सांगले (२४, वागळे इस्टेट, ठाणे) यांच्या टाटा सुमोची (एमएच ०४ एफआर १६३५) दुचाकीला जोरदार धडक बसली. त्यामध्ये चालक संदेशचा जागीच मृत्यू झाला. साहील व विकास रस्त्याच्या कडेला फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. या दोघांवर उपचार सुरु असताना रविवारी पहाटे ५.३० वाजता साहीलची प्राणज्योत मालवली. या अपघातानंतर मुरडे-रामवाडी आणि गिम्हवणे या गावांवर शोककळा पसरली आहे.दुसरा अपघात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास भरणे जाधववाडी नजीक घडला. मुंबईहून राजापूरला प्रवासी घेऊन निघालेली पद्मावती ट्रॅव्हल्सची खासगी आरामबस जाधववाडी येथे आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती बस रस्त्याच्या उजव्या बाजूला कलंडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाहीत. तिसरा अपघातात खवटी येथील रेल्वे पुलाखाली घडली. चिपळूणहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेली क्वालिस कार चालकाच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यातच पलटी झाली.या अपघातात क्वालिसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाल्याने ते सुदैवाने बचावले. (प्रतिनिधी)आज रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील भोस्ते घाटात आणखी एक अपघात घडला. मुंबईहून कणकवलीकडे निघालेली आय-२० ही कार भोस्ते घाटात आली असता चालकाचा ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला कलंडली. या अपघातात मनुष्यहानी झाली नसली तरी कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अन्य एका अपघातात खेड - दापोली मार्गावरील टाळसुरे गावानजीक भरधाव वेगाने चाललेली स्कार्पिओ कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात कारमधील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. (प्रतिनिधी)मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या दोन दिवसात अपघातांचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या गणेशभक्तांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसामुळे रस्ते निसरडे बनले असून, वाहने जपून चालविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
जिल्ह्यात पाच अपघातात दोन ठार
By admin | Published: August 31, 2014 11:01 PM