रत्नागिरी : स्वत:जवळ ब्राऊन हेराॅईन बाळगलेल्या तरुणाला पाेलिसांनी रंगेहाथ पकडले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतिन महामुद शेख (३१, रा. ओसवालनगर राेड, उद्यमनगर, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून १०,८५० रुपयांचे २ किलाे ब्राऊन हेराॅईन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई माळनाका - थिबा पाॅईंट मार्गावरील एका महाविद्यालयाच्या गेटजवळ शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली.याप्रकरणी रत्नागिरीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पाेलिस हेडकाॅन्स्टेबल याेगेश नार्वेकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ते शुक्रवारी सायंकाळी ६:४० वाजण्याच्या दरम्यान माळनाका - थिबापाॅईंट रस्त्याकडून राजेंद्रनगरकडे जात हाेते. त्यावेळी तेथील एका महाविद्यालयाच्या गेटजवळ रस्त्याशेजारी मतिन शेख उभा हाेता. हेडकाॅन्स्टेबल नार्वेकर यांना संशय आल्याने त्यांनी त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे प्लास्टिक पिशवीत एकूण ३१ पुड्या सापडल्या. या पुड्यांची तपासणी केली असता त्यामध्ये ब्राऊन हेराॅईन (टर्की पावडर) असल्याचे लक्षात आले. या पुड्या जप्त करण्यात आल्या.
तसेच या कारवाईत लहान कागदाचे तुकडे, प्लास्टिक पाऊच, लायटर, सिगारेट, माेबाइल आणि दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. पाेलिसांनी ब्राऊन हेराॅईनसह एकूण ५०,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात मतिन शेख याच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३चे कलम एन. डी. पी. एस. अॅक्ट १९८५ चे कलम ८ (क), २१ (अ) प्रमाणे शुक्रवारी रात्री उशिराने गुन्हा दाखल केला आहे.
महाविद्यालयीन तरुणांना विक्री?एका महाविद्यालयाच्या गेटजवळच ब्राऊन हेराॅईन घेऊन मतिन शेख सापडल्याने खळबळ उडाली आहे. महाविद्यालयीन तरुणांना ब्राऊन हेराॅईन विक्रीसाठी ताे त्याठिकाणी आल्याचा संशय व्यक्त हाेत आहे. या महाविद्यालयीन तरुणांना त्याने शिकार बनविले असल्याची चर्चा सुरु असून, त्याने यापूर्वी तरुणांना अमली पदार्थ विकला आहे का, याचा शाेध पाेलिस घेत आहेत.