रत्नागिरी : ताैक्ते चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वाढलेला वेग व पर्जन्यवृष्टी यामुळे जिल्ह्यातील महावितरणची यंत्रणा कोलमडली आहे. राजापूर, लांजा, संगमेश्वर हे चार फिडर पूर्णत: बंद असून, देवरूख फिडरचा शहरासहित निम्मा भाग बंद आहे. जिल्ह्यातील २ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा ठप्प झाला आहे.
वादळाचा वेग वाढल्यानंतर महावितरणने खबरदारी घेत दुपारी २ वाजल्यापासून वीज पुरवठा बंद केला होता. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत वाऱ्याचा वेग कायम होता. त्यामुळे वीज पुरवठा पूर्ववत करण्यात अडचण येत हाेती़ वाऱ्याचा वेग कमी झाल्यानंतर बाधित भाग वगळता अन्य ठिकाणचा वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू करण्याचा निर्णय महावितरणने घेतला हाेता.
कुवारबाव ३३ केव्ही वीज वाहिनीवर झाड कोसळले आहे. सायंकाळी झाड हटविण्याचे काम सुरू असल्याने रात्री उशिरा शहरातील वीज पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. नाचणे, शिरगाव येथील उपकेंद्र बंद पडली आहेत़ वादळी वाऱ्याचा वेग कमी झाल्यानंतर वीज वाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे़ राजापूर शहर, हातीवले, आडिवरे, पडवे, लांजा उपकेंद्र बंद आहे़ गावखडी येथे विजेच्या खांबावर माड पडल्याने वाहिनी बंद पडली आहे़
राजापूर, लांजा, संगमेश्वर फिडर बंद पडले आहेत. शिवाय रत्नागिरी तालुक्यासह अन्य तालुक्यात जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. फांद्या तुटल्या असून विजेचे खांबही कोसळून वाहिन्या तुटल्या आहेत.
आपत्तीचा सामना करण्यासाठी महावितरणची टीम सज्ज असून पुरेसे साहित्यही उपलब्ध आहे. त्यामुळे सोमवारी दुपारपर्यंत जिल्ह्यातील वीजपुरवठा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर, कार्यकारी अभियंता रामलिंग बेले परिस्थितीचा आढावा घेत असून, वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा पू्र्ववत हाेण्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे़ नैसर्गिक आपत्तीत नागरिकांनी संयम बाळगावा तसेच वीज वाहिनी दुरुस्तीसाठी स्वत: काेणतेही धाडसी प्रयत्न करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे़