रत्नागिरी : शहरासह तालुक्यातील वाटद, सैतवडे, सोमेश्वर, भाट्ये अशा एकूण पाच ठिकाणी पोस्ट पेमेंटस् बँक सुरू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या बँंकेचे २,००० खातेदार झाले आहेत. डिसेंबरअखेर जिल्ह्यात पोस्ट पेमेंटस् बँकेच्या ६५८ शाखा सुरू करण्यात येणार आहेत. या संदर्भातील प्रशिक्षण सुरू झाले असल्याची माहिती रत्नागिरीचे डाकघर अधीक्षक ए. बी. कोड्डा यांनी दिली.
१ आॅक्टोबर १८५४ साली भारतात स्थापन झालेल्या पोस्ट खात्याने २०१८ साली १६४ वर्षे पूर्ण करून १६५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. विविध कंपन्यांच्या स्पर्धेत आता टपाल विभागानेही चांगलीच गती घेतली आहे. टपाल विभागाला मधल्या काळात आलेली मरगळ झटकून २०१२ सालानंतर या विभागाचा ‘हायटेक’ प्रवास अधिकाधिक वेगाने होऊ लागला आहे. मनीआॅर्डर सेवा, स्पीड पोस्ट, आॅनलाईन वीजबिल भरणा, फोनबिल भरणा, आधारकार्ड सेवा या सेवांबरोबरच आता भारतात कुठेही काही क्षणातच संदेश पोहचवणारी ई - पोस्ट सेवा, देशात आणि परदेशात पाठवलेले टपाल कुठपर्यंत पोहोचले, हे ग्राहकांना पाहता यावे यासाठी स्पीड पोस्टची ‘ट्रॅक अँड ट्रेस’ सुविधा, तत्काळ देशात तसेच परदेशात पैसे पाठवण्याची ‘इन्स्टंट मनिआॅर्डर’ (आयएमओ), मोबाईल मनी ट्रान्सफर सेवा, विदेशातून रक्कम हस्तांतरणासाठी वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफर या सेवा सुरू केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय टपाल दिनाचे औचित्य साधून या विभागाने गतवर्षी भारतातून एशिया पॅसिफिक देशांसाठी नवीन ई - कॉमर्स सेवा सुरू केल्याने आता २ किलोपर्यंतच्या वस्तू आपणास आॅस्ट्रेलिया, जपान, मलेशिया, सिंगापूर आदी एशिया पॅसिफिक देशांमध्ये पाठवता येत आहेत.
यावर्षी पोस्टाची सर्व कार्यालये आॅनलाईन झाली आहेत. त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना मध्यवर्ती असणाºया राजापूर येथे पासपोर्ट सेवाही सुरू करण्यात आली आहे. आपली ग्रामीण जनतेशी वर्षानुवर्षे असलेली नाळ जपत पोस्ट खात्याने १ सप्टेंबर रोजी बँकिंग क्षेत्रातही महत्त्वाचे पदार्पण केले आहे. इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक रत्नागिरीसह तालुक्यातील वाटद, सैतवडे, सोमेश्वर, भाट्ये अशा एकूण पाच ठिकाणी सुरू झाल्या आहेत. केवळ दोन महिन्यांच्या आतच २,००० खातेदारांनी याठिकाणी खाते उघडत पोस्टाचा विश्वास सार्थ ठरवला आहे. ग्रामीण भागातील पोस्टाच्या ग्राहकांना अगदी घरबसल्या पोस्टमन एका क्लिकवर बँकेतून पैसे काढून देण्याची किंवा बँकेत पैसे भरून घेण्याची सुविधा देत आहेत. इतर बँकांप्रमाणेच ही बँक ग्राहकांना सेवा देत आहे.
पोस्टाची सेवा ही खेडोपाडी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे डाक विभाग बँकिंग क्षेत्रात उतरला आहे. पोस्टमास्टर तसेच ग्रामीण डाकसेवक यांचं ग्रामीण भागातील जनतेशी एक वेगळं नातं आहे. त्यामुळे भारतीय डाक विभागाला बँकिंग उपक्रमामध्येही चांगले यश मिळत असल्याचे कोड्डा यांनी सांगितले.
चौकट
रत्नागिरी जिल्ह्यात पोस्टाच्या ५८४ ग्रामीण शाखा, ७७ उपडाकघर तसेच रत्नागिरी व चिपळूण येथील २ प्रधान डाकघर मिळून एकूण ६६३ कार्यालये आहेत. रत्नागिरीतील मुख्य डाकघर तसेच ४ ग्रामीण शाखांमध्ये पोस्ट पेमेंटस् बँक सुरू झाल्या असून, उर्वरित ६५८ शाखांमध्ये डिसेंबरपर्यंत ही सेवा सुरू होणार आहे.
मोठमोठे उद्योजक, व्यापारी संस्था यांना पोस्ट पेमेंट बँकेच्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. ग्राहकांना या संस्थांमधून कॅशलेस व्यवहार करता येण्यासाठी पोस्टाच्या या बँंकेचा उपयोग करता येणे शक्य असल्याने भविष्यात अशी व्यापारी खाती (मर्चंट अकांऊट) अधिकाधिक सुरू करण्याचा मानस असल्याचे डाकघर अधीक्षक ए. बी. कोड्डा यांनी सांगितले.