रत्नागिरी : पावसाळी बंदी काळात सागरात मासेमारी करणाऱ्या आणखी दोन नौकांवर मत्स्य व्यवसाय विभागाने शुक्रवारी कारवाई केली. या दोन्ही नौका जयगडमधील असून, त्यामधील एकूण ४० हजार किमतीची मासळी जप्त करण्यात आली आहे. नियमभंग केल्याने या दोन्ही नौकांना दोन लाखापर्यंत दंड होऊ शकतो, अशी माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव यांनी दिली.जिल्ह्यात सागरी मासेमारी बंदीचे उल्लंघन करून मासेमारी करताना जयगड येथील शौकत अब्दुल उमर डांगे यांच्या मालकीच्या आयेशा उमर नौकेवर ३० हजार रुपयांची मासळी सापडली, तर जयगड येथील फत्तेमहम्मद हुसैन मुजावर यांच्या मालकीच्या जयगडचा राजा १ या नौकेवर १० हजार रुपयांची मासळी आढळून आली.
विशेष म्हणजे या दोन्ही नौका विनानंबरच्या आहेत. या नौकांवर कारवाई करणाऱ्या पथकामध्ये गुहागरचे परवाना अधिकारी संतोष देसाई, रत्नागिरीच्या परवाना अधिकारी रश्मी आंबुलकर, सुरक्षा पर्यवेक्षक पुरुषोत्तम घवाळी यांचा समावेश होता.गुरुवारीही जिल्ह्यात सुभाष भाग्या तांडेल यांच्या मालकीच्या मिनी पर्ससीन मासेमारी नौकेवर कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये २८०० रुपयांची मासळी जप्त करण्यात आली. २ जूनपासून ७ जूनपर्यंत बेकायदा मासेमारी करणाऱ्या १३ मासेमारी नौकांवर कारवाई करण्यात आली आहे. नौकांविरोधात केसेसही दाखल करण्यात आल्या आहेत.