रत्नागिरी - वटपौर्णिमेसाठी भांडुप - मुंबईला फणस घेऊन जाणारा आयशर टेम्पो उलटून सिंधुदुर्गातील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गाला पर्यायी पाली - निवळी बावनदी या रस्त्यावर काल (शनिवारी) रात्री ११.४५ वाजण्याच्या दरम्याने शेल्टेवाडी येथे घडली. देवेंद्र आत्माराम बिड्ये व जयवंत कृष्णा बिडये असे मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नाव असून अन्य चौघे जखमी झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव-बिड्येवाडी (ता. कणकवली) येथून आयशर टेम्पो (एमएच-०७-एक्स-१७९०) घेऊन चालक अनिकेत लक्ष्मण बिड्ये कणकवली येथून रात्री ८ वाजताच्या दरम्यान भिवंडी - मुंबई येथे जाण्यासाठी निघाले होते. पाली येथे आल्यावर मुंबई - गोवा महामार्गाला पर्यायी पाली - निवळी बावनदी या रस्त्याने जात होता. रात्री ११.४५ वाजण्याच्या दरम्यान निवळी - शेल्टेवाडी येथे आल्यावर रस्त्यावर पावसाचे पाणी आले होते. त्यातच उतारावरील अवघड वळणावर चालकाने ब्रेक केले असता बाजूला उलटला.
यामध्ये ट्रकच्या मागील हौद्यामध्ये बसलेले हमाल देवेंद्र आत्माराम बिड्ये (४७) व जयवंत कृष्णा बिड्ये (४५) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे सांगितले. तसेच या टेम्पोतून प्रवास करणारे इतर हमाल विठ्ठल विजय बिड्ये, लक्ष्मण बिड्ये, आश्विनी बिड्ये, अनिकेत बिड्ये, राजेश तांबे (सर्व रा. नांदगाव, बिड्येवाडी) हे जखमी झाले आहेत.