रत्नागिरी : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेची जबाबदारी नगर परिषदेची असल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांची दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांसाठी स्वतंत्र वाहनही उपलब्ध आहे. त्यामुळे शहरातील माळनाक्यापासून वरचा भाग व खालचा दोन भाग अशा दोन भागातील निर्जंतुकीकरण या पथकाकडून करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील महिला रुग्णालय कोरोना रुग्णांनी फुल्ल झाले आहे. त्यामुळे लवकरच नगर परिषदेच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. निर्जंतुकीकरण करणाऱ्या टीमच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालय, हाॅटेल, बॅंका, प्रशासकीय कार्यालयांतूनही फवारणी केली जाणार आहे. शिवाय शहराच्या ज्या भागात किंवा गृहनिर्माण सोसायटीमध्ये कोरोना रुग्ण असेल व त्या इमारत व परिसराचे निर्जंतुकीकरण करायचे असेल, त्यासाठी नागरिकांनी नगरपरिषदेच्या (०२३५२-२२३५७६) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नगराध्यक्ष साळवी यांनी केले.
शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पाचशे रुपये दंड वसूल करून त्याला मास्क दिला जाणार आहे. जेणेकरून पुन्हा त्या नागरिकाकडून चूक होणार नाही. शहरामध्ये विविध बांधकामे सुरू आहेत. बांधकामासाठी अन्य राज्यातील कामगार कामाला आहेत. संबंधित कामगारांनीही कामाच्या ठिकाणी मास्क परिधान करणे आवश्यक आहे. अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचे नगराध्यक्ष साळवी यांनी सांगितले.
शहरातील चर्मालय येथील स्मशानभूमी कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आली असून, शवदाहिनीची क्षमता वाढविण्यात आली आहे. एका तासाला एका शवाचे दहन होणार आहे.