चिपळूण : तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक अजित साळवी यांची दोन वाहने अज्ञाताने जाळल्याचा प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अजित साळवी यांनी नेहमीप्रमाणे आपली वाहने शेडमध्ये सुरक्षित अंतर ठेवून उभी केली होती. मात्र, सोमवारी मध्यरात्री ही वाहने जळत असल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेत वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. ही वाहने जाळण्यात आल्याचा आरोप अजित साळवी यांनी केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
गेल्या काही महिन्यांमध्ये वाहने जाळण्याचे प्रकार वाढले आहेत. ही वाहने रागापाेटी काेणी जाळत आहेत का, याचा शाेध घेण्याचे आव्हान पाेलिसांसमाेर उभे राहिले आहे. वाहनांना आग नेमकी कशामुळे लागत आहे, याचा शाेध पाेलिसांना घ्यावा लागणार आहे. मात्र, द्वेषामुळे वाहने जाळण्याचे प्रकार घडल्यास कालांतराने त्यातून वादंग निर्माण हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घटनांचा लवकर तपास करून दाेषींना ताब्यात घेण्याची मागणी हाेत आहे.