रत्नागिरी : केंद्र सरकारकडून जिल्ह्यासाठी आलेल्या २६ व्हेंटिलेटर्सपैकी दापोली येथील दोन व्हेंटिलेटर्स खराब असल्याच्या वृत्ताला जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी ्ऑनलाइन आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दुजाेरा दिला आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले, केद्र सरकारकडून जिल्ह्याला २६ व्हेंटिलेटर्स मिळाले. त्यापैकी दापोली येथील दोन खराब आहेत. ते दुरुस्त करायला सांगितले आहे. तसेच कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने नवीन चार-पाच अजूनही उभारण्यात आलेले नाहीत.
जिल्ह्यातून १६ जूनपासून आतापर्यंत २६४ अहवाल सीएसआरचे पाठविण्यात आले असून त्यात जिल्ह्यात डेल्टा प्लसचे एकूण १६ रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण संगमेश्वर तालुक्यातील धामणी आणि आंगवली या गावांमधील आहेत. यापैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून उर्वरित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात डेल्टा प्लसचा एकही रुग्ण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी म्हणाले, ४ ऑगस्ट रोजी पाठविलेल्या अहवालात तिघांचे अहवाल डेल्टा प्लस पाॅझिटिव्ह आले. मात्र, त्यांना कोणतीच लक्षणे नव्हती. कोरोना रूटीन चाचणीत ते पाॅझिटिव्ह आल्याने डेल्टा प्लसचा अहवाल येण्याआधीच त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यामुळे हे रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. १६पैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईत उपचारादरम्यान झालेल्या रुग्णाचा समावेश आहे.
जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेल्या वृद्धेच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणी कंत्राटी महिला कर्मचारी याला बडतर्फ करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्याकडे हे दागिने सापडले असून ते मृताच्या नातेवाइकांकडे सोपविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
लस राज्याकडून उपलब्ध होताच त्याचे ज्येष्ठ नागरिक आणि इतरांसाठी योग्य नियोजन करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.