रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयातील अपुऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती घेऊन सरकारचे म्हणणे दोन आठवड्यात सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत.जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे कार्यरत असलेले वैद्यकीय कर्मचारी आणि इतर आरोग्य यंत्रणा यांच्यावर प्रचंड ताण आलेला आहे. तसेच दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसंदर्भात रत्नागिरीतील खलील वस्ता यांनी अॅड. राकेश भाटकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे.मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ न्यायमूर्ती ए. ए. सय्यद तसेच न्यायमूर्ती तावडे यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी याचिकेची सुनावणी झाली. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रिक्त असलेली वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तसेच इतर आरोग्य यंत्रणेतील पदाबाबत युक्तिवाद करण्यात आला.
याचिकाकर्त्याने दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात माहिती घेऊन सरकारचे म्हणणे दोन आठवड्यात सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यासंदर्भात अॅड. राकेश भाटकर यांनी मागणी केली. पुढील तारखेपर्यंत सरकार पक्षातर्फे ठोस पावले उचलली जावीत, अशी अपेक्षा न्यायालयासमोर व्यक्त केली.सरकारला हवी मुदतरत्नागिरीतील जिल्हा रुग्णालय व इतर वैद्यकीय रुग्णालयांबाबत विचारणा केली असता सरकारी पक्षातर्फे याबाबत माहिती घेण्यासाठी पुढील तारखेची विनंती केली.