चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटातील वांगीपूल येथे चिपळूणहून डेरवणकडे जाणाऱ्या दुचाकीला सुमो गाडीने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडला. गोंधळे येथील भालचंद्र शंकर गोंधळेकर (वय ७०, रा. गोंधळे) हे आपल्या आजारी नातेवाइकाला पाहण्यासाठी डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात दुचाकीने जात होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अंजली भालचंद्र गोंधळेकर (६५) होती. सावर्डेहून चिपळूणकडे येणाऱ्या सुमो गाडीची त्यांना धडक बसून दोघेही गंभीर जखमी झाले. अपघात होताच सुमोचालक गाडीसह पसार झाला. त्यामुळे उशिरापर्यंत गोंधळेकर जखमी अवस्थेत महामार्गावर पडून होते. सावर्डेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, हवालदार बच्छाव, शैलेश जाधव, दत्तात्रय नाईक, आदींनी जखमींना वालावलकर रुग्णालयात दाखल केले. तेथे गोंधळेकर यांचे निधन झाले. गोंधळेकर यांच्या पत्नी अंजली यांच्यावर उपचार सुरूआहेत. अपघाताची नोंद सावर्डे पोलीस ठाण्यात झाली असून, अधिक तपासासाठी ती चिपळूण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
कामथे घाटात सुमोच्या धडकेने दुचाकीस्वार ठार, पत्नी जखमी
By admin | Published: February 07, 2016 1:00 AM