रत्नागिरी - दीड दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी गेलेले दोघेजण बुडाल्याची घटना फणसोप - टाकळे (ता. रत्नागिरी) येथील काजळी नदीच्या खाडीत रविवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या दरम्यान घडली. सत्यवान उर्फ बाबय शरद पिलणकर (४५) आणि विशाल सुनील पिलणकर (२७) अशी बुडालेल्या दोघांची नावे आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता.
गणेश विसर्जनाला नियमांचे बंधन घालण्यात आले असले तरी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, या उत्साहाला रविवारी रात्री गालबोट लागले. रत्नागिरी शहराजनीकच्या फणसोप - टाकळे येथे असलेल्या काजळी नदीच्या खाडीजवळ एक ओढा आहे. या ओढ्यात परिसरातील भाविक गणपतींचे विसर्जन करतात. रविवारी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी भाविक आले होते. गणेश विसर्जनासाठी विशाल पिलणकर आणि सत्यवान पिलणकर हे दोघे पाण्यात उतरले होते. मात्र, अचानक पाण्यात भोवरा आला आणि त्यात ते दोघे बुडू लागले. तेथील ग्रामस्थांच्या हे लक्षात येताच त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाचविण्यासाठी दोरही आणण्यात आला होता. मात्र, तोपर्यंत दोघेही पाण्यात बेपत्ता झाले.
या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हेही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत बुडालेल्या दोघांचा शोध घेण्याचे काम सुरु होते.