चिपळूण : जिद्द, चिकाटीच्या जोरावर धाडसी पाऊल उचलत चिपळुणातील दोन सुकन्यांनी तब्बल ८०० किलाेमीटरचे अंतर सायकलने पार करत गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पर्यंतचा प्रवास केला. एवढ्या लांब पल्ल्याचे अंतर सायकलने पार करणाऱ्या कोकणातील या दोघी पहिल्याच असून, त्यांच्या या धाडसाचे चिपळूणवासीयांकडून कौतुक होत आहे. चिपळूण सायकलिंग क्लबच्या सदस्य असणाऱ्या धनश्री गोखले व डॉ. अश्विनी गणपत्ये यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पर्यंत सायकलने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. तसे पाहिल्यास ठाणे ते अहमदाबादच्या दिशेने जाणारा हा एक्स्प्रेस हायवेलगत असून, त्यावरून भरधाव वेगात जाणारी वाहने, शिवाय बोचरी थंडी आणि सततची वर्दळ अशा स्थितीत गोखले व गणपत्ये यांनी २१ जानेवारी रोजी प्रवास सुरू केला. त्यांचा खरा प्रवास ठाण्यातून सुरू झाला.दररोज त्या दीडशे किलोमीटर अंतर सायकलने पार करत ठाणे, वापी, अंकलेश्वर त्यानंतर ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ अशा टप्प्यात त्यांच्या प्रवासाचे नियोजन होते. अखेर तीन दिवसांनी अथक प्रयत्नानंतर २३ जानेवारी रोजी त्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ याठिकाणी जाऊन पोहोचल्या. धनश्री गोखले यांनी यापूर्वी अहमदाबाद एक्स्प्रेस हायवेवरून सायकलने प्रवास केल्याने तो अनुभव त्यांच्याजवळ होता.
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पर्यंत पोहाेचल्यावर धनश्री गोखले व डॉ. अश्विनी गणपत्ये यांच्या चेहऱ्यावर ध्येय गाठल्याचे अनोखे समाधान उमटले हाेते. त्यानंतर पुन्हा त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. त्या दोघी चिपळुणात येताच त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी आपला प्रवास कथ केला.
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पर्यंत सायकलने जाण्याचा अनुभव अभूतपूर्व होता. इतक्या दूरवरचा प्रवास सायकलने पार करण्यासाठी निश्चित सराव हवाच. यासाठी चिपळुणातील ग्रामीण भागातील रस्त्याचा आधार घेतला. महिलाही सायकलने इतक्या दूरवर प्रवास करू शकतात, हे यातून सिध्द झाले. चिपळुणातील महिलांनीसायकलिंग करावे, यासाठी एक महिलांचा सायकलिंग क्लब आहे. त्यामध्ये सहभागी व्हावे. - धनश्री गाेखले.