सावर्डे : आईची माया ही आकाशाएवढी असते, प्रेम वात्सल्य आणि जिव्हाळ्याने घराला घरपण देणाऱ्या दोन माता काळाच्या पडद्याआड गेल्या. काळाने डाव साधला आणि येगाव डोगबाव (सुतारवाडी) येथील दोन महिला गतप्राण झाल्या. अठराविश्व दारिद्र्य पाचवीला पूजलेल्या पांचाळ कुटुंबांवर हे आणखी एक संकट आलं. वेळ आली की कुणाचे काही चालत नाही. अगदी त्याचप्रमाणे येगाव येथील दोन महिला विजया विजय पांचाळ व शांती रामचंद्र पांचाळ या दोघीजणी एकाच भावकीतील होत्या. घरात अठराविश्व दारिद्र्य होते. दोनवेळचे अन्न मिळविण्यासाठी दिवसभर काबाडकष्ट केल्याशिवाय गत्यंतर नाही. पण संगमेश्वरनजीक माभळे येथे सोमवारी सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास त्या ज्या ट्रॅक्सने जात होत्या, त्या ट्रॅक्सवर ट्रक कोसळला आणि या दोघींचाही त्यात मृत्यू झाला. दोघींच्या अपघाती मृत्यूने अवघी वाडी खचून गेली. दुपारची रणरणत्या उन्हाची वेळ होती. सर्वजण आपापल्या घरी कामात मग्न असताना अचानक एक फोन आला. आपल्या गावातील लोकांचा अपघात झाला. सर्वजण घाबरून, गांगरुन गेले. कोणालाही काहीही कळेनासे झाले. आरडाओरडा सुरु झाला. विजया पांचाळ यांचे पती विजय पांचाळ यांंच्यावर आता कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली आहे. त्यांच्या पत्नीचे अपघातात निधन झाल्यानंतर आणि त्यातच मुलगा गतीमंद असल्याने आता संसाराचे दुसरे चाक कसे ओढायचे? या विवंचनेत ते आहेत. अठराविश्व दारिद्र्यातही सोन्याचा संसार करणारी पत्नी सोडून गेल्याच्या दु:खाने त्यांना शोक आवरत नव्हता. शांती पांचाळ यांच्याही घरात कमालीची दारिद्र्य होते. या दोघींच्या मृत्यूने दोन्ही घरांवर शोककळा पसरली. संध्याकाळी सात वाजता दोघांचे मृतदेह वाडीत आणण्यात आले. हे दृश्य पाहून अनेक ग्रामस्थांचे डोळे पाणावले. (वार्ताहर) नशीब बल्लवत्तर पांचाळ कुटुंबिय त्यांच्या नात्यातील एकाचे निधन झाल्याने प्रेतयात्रेसाठी निघाले होते. अपघातग्रस्त गाडीत अन्य पांचाळ कुटुंबियांसह सुधीर अनंत पांचाळ हा मुलगा तसेच शैलेश गणेश जोंधळे, संतोष पांचाळ हे तिघेजण बसले होते. गाडीवर ट्रक ज्यावेळी आपटला, त्यावेळी सुधीर मोठमोठ्याने ओरडत होता तर बाकीचे निपचित पडले होते. वाडीतील भारती भास्कर पांचाळ व सुजाता गजानन पांचाळ यांनाही प्रेतयात्रेला चलण्याचा आग्रह करण्यात आला होता. मात्र, या दोघींनीही काम असल्याने त्यांच्याबरोबर येण्यास नकार दिला; त्यामुळे त्या नशीबवान ठरल्या. हाराने घात केला नातेवाईकाच्या प्रेतयात्रेला येगावहून निवळी वेळवंड येथे जाणारे पांचाळ कुटुंब संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या हाराच्या दुकानात मयत नातेवाईकाला हार घेण्यासाठी थांबले असतानाच गाडीवर कंटेनर आदळला आणि हाराने घात केला, असे राजेंद्र पांचाळ व विलास पांचाळ सांगत होते.
दोन महिलांच्या मृत्यूने येगाव सुतारवाडीवर शोककळा
By admin | Published: April 05, 2016 12:54 AM