चिपळूण : मंगला एक्स्प्रेसच्या गार्ड डब्यातून प्रवास करणाऱ्या दोन तरुणांनी एका प्रौढाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन त्याच्याजवळील ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यात गंभीर जखमी अवस्थेतील प्रौढाला चिपळूण रेल्वे स्थानकात उतरवून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी सकाळी लांजा तालुक्यातील विलवडे रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. याबाबत चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपासासाठी गुन्हा लांजा पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आला आहे. कणकवली येथील विकास सुभाष खानोलकर हे कोकण रेल्वेच्या ठेकेदाराकडे कंत्राटी कामगार आहेत. ते कणकवली येथून चिपळूणला येण्यासाठी मंगळवारी सकाळी ७ वाजता मंगला एक्स्प्रेसमध्ये गार्ड डब्यात बसले. या डब्यामध्ये १८ ते २० वयोगटातील आणखी दोन युवक प्रवास करीत होते. मात्र, गाडीमध्ये सुरक्षारक्षक नव्हता. ही गाडी विलवडे रेल्वे स्थानकाजवळ १० वाजण्याच्या सुमारास आली असता क्रॉसिंगसाठी थांबली. ही संधी साधून दोघांनी बेसावध असणाऱ्या खानोलकर यांच्यावर पाठीमागून हल्ला केला व लोखंडी रॉडने मारहाण केली. या धक्क्याने ते बेशुद्ध पडले. गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकात आली असताना गाडी सुटण्याच्या वेळेला शुद्धीवर आलेल्या खानोलकर यांनी खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला. यावेळी इंजिन चालकाची नजर त्यांच्यावर पडली. त्याने तातडीने याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना दिली. दोन युवकांनी जाताना गार्ड डब्याला कडी लावली होती. त्यामुळे दोघेही रत्नागिरी स्थानकावर उतरुन पसार झाले. दरम्यान, रेल्वे सुरक्षा जवानांनी हालचाल करण्यापूर्वीच गाडी सुटल्याने या जवानांनी याची माहिती चिपळूण रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी दिली. गंभीर जखमी झालेल्या खानोलकर यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला होता. चिपळूणमध्ये त्यांना गाडीतून खाली उतरविण्यात आले व तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी कंपनीचे अधिकारी सिंगही उपस्थित होते. खानोलकर यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन, २ हजार रुपये व सॅमसंग ग्रँड मोबाईल दोघांनी लुटल्याचे खानोलकर यांनी पोलिसांना सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, हवालदार विवेक साळवी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास लांजा पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)मंगला एक्स्प्रेसच्या गार्ड डब्यातून प्रवास करणाऱ्या दोघा तरूणांचे कृत्य.जखमी अवस्थेत प्रौढाला रुग्णालयात केले दाखल.चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल.सोन्याची चेन, रोख रकमेसह मोबाईलही लांबवला.
दोघा युवकांची प्रवाशाला मारहाण
By admin | Published: November 19, 2014 9:24 PM