रत्नागिरी : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष उबेदउल्ला निजामुद्दीन होडेकर यांच्यासह तिघांवर झालेल्या प्राणघातक हल्याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.रत्नागिरी उद्यमनगर येथील एमआयडीसी परिसरात १२ आॅक्टोबर २०१८ रोजी मध्यरात्री २ वाजता उद्यमनगर येथील सिमेंट कंपनीजवळ प्राणघातक हल्ला झाला होता.
याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी अल्ताफ संगमेश्वरी, विजय माने, अनिकेत वालम, हर्षल शिंदे व सिकंदर यासीन खान उर्फ कालिया यांच्यासह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी होऊन संशयाचा फायदा देत संशयित आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.यातील आरोपींचा काही राजकीय पक्षांशी संबंध असल्याने या खटल्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तलवारीने झालेल्या हल्ल्यात उबेद होडेकरसह मुदस्सर मेहबुब काझी (३५, रा.उद्यमनगर, राजापूरकर कॉलनी), अझर इक्बाल सावंत (३२, राजापूरकर कॉलनी) हे जखमी झाले होते. हल्ला केल्यानंतर महत्वाचे पाच संशयित आरोपी फरार झाले होते. त्यांना पोलिसांनी पाली-रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर पकडले होते. अटकेतील सर्व संशयित आरोपी गेल्या दहा महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत होते. याप्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यावर सुनावणी सुरू होती. याप्रकरणी अंतिम सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने संशयाचा फायदा देत आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.