रत्नागिरी : राजापूरचे आमदार राजन साळवी यांना रत्नागिरीची उमेदवारी दिली गेली तर आपण त्यांचे स्वागतच करु, असे सांगतानाच मंत्री उदय सामंत यांनी, उद्धव ठाकरे शिवसेनेने एक कोणतेतरी नाव निश्चित करावे, असा टोलाही मारला. रत्नागिरीत प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री सामंत यांनी ही भूमिका मांडली. लोकशाहीमध्ये कोणीही कोणत्याही मतदार संघातून उभा राहू शकतो. जर आमदार राजन साळवी रत्नागिरी मतदार संघातून निवडणूक लढणार असतील तर आपण ढोलताशांनी त्यांच्या उमेदवारीचे स्वागतच करू, असे ते म्हणाले.
लोक जोपर्यंत स्वीकारतील, तोपर्यंत आपण आमदार असू. जोवर मतदारांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत मी कोणाच्याही उमेदवारीची काळजी करण्याचे कारणच नाही, असे त्यांनी सांगीतले. मात्र उद्धव ठाकरे शिवसेनेने आपला कोणीतरी एक उमेदवार निश्चित करावा. दर पंधरा दिवसांनी कोणाचे ना कोणाचे नवे नाव घेतले जाते. ते तरी आधी निश्चित होऊ दे, असा टोलाही त्यांनी हाणला.