रत्नागिरी : पुणे येथील कात्रज चौकात गेल्या आठवड्यात आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. ज्याठिकाणी हल्ला झाला त्या कात्रज ठिकाणी मी आणि तानाजी सावंत दोघेही जाहीर सभा घेणार असल्याचे आमदार उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. मागून वार करण्यापेक्षा मी तारीख आणि वेळ देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर होते. पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांच्या मतदार संघात त्यांची जाहीर सभा झाली. या कार्यक्रमाला माजी मंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्याच दिवशी युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचीही कात्रज चौकात सभा होती. यावेळी कात्रज चौकातून जात असताना आमदार सामंत यांची गाडी फोडण्यात आली. याचठिकाणी सभा घेणार असल्याचे आमदार सामंत यांनी जाहीर केले आहे.आमदार उदय सामंत रविवारी रत्नागिरी तालुक्यातील पाली येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, शिवसेना आणि भाजप युती भविष्यातील निवडणुका सोबत लढवणार आहेत. शिवसेना ही भाजपबरोबर युती करत असताना मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुठच्या जागा कशा लढायच्या हे ठरवेल जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून खासदारकीपर्यंतच्या सर्व निवडणूका आम्ही शिवसेना - भाजप युती म्हणूनच लढणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.राज्यातल्या कामांसाठी दिल्लीवारीमुख्यमंत्र्यांची दिल्ली वारी हा एक कामाचाच भाग असतो. यापूर्वीही राज्यातल्या कामांसाठी दिल्लीवारी करण्यात आलेली आहे, असे सामंत यांनी सांगितले. दीपक केसरकर विरुद्ध राणे यांच्यामध्ये काही दिवसांपासून वाकयुद्ध सुरु आहे त्यावर बाेलताना केसरकर आणि राणे हा वाद केवळ मनोरंजन म्हणून घ्यावा, असे सांगितले.
पुण्यात 'हल्ला' झालेल्या ठिकाणीच 'जाहीर सभा' घेणार - उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 4:20 PM