दापोली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ईडीची भीती घातली असल्याने ते भाजपला घाबरत असल्याची टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दापोली येथे बोलताना केली. शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने दापोलीत आलेल्या अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली.शिवस्वराज्य यात्रेनिमित्त दापोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेने सुरू केलेली जनआशीर्वाद यात्रा कधी सुरू झाली व कधी संपली ते कुणालाही कळले नाही. सरकारकडून सर्वांचा गेल्या पाच वर्षात सर्व पातळ्यांवर अपेक्षाभंग झालेला आहे. या पाच वर्षात तब्बल १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर १ लाख ४४ हजार युवक बेरोजगार झाले आहेत. कायदा व सुरक्षेचा प्रश्न सुरक्षेचाबोजवारा उडालेला आहे. त्यामुळे शिवस्वराज्य यात्रा ही सर्वसामान्यांना आपली यात्रा वाटत आहे. रस्तोरस्ती आमचे होणारे स्वागत ही आमच्या विजयाची नांदी असल्याचेही डॉ. कोल्हे यांनी सांगितले.ज्यावेळी गुजरात येथे सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा उभा राहिला. पण शिवसेनेला महाराष्ट्रात शिवरायांचे स्मारक उभारता आलेले नाही, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने कृषी सन्मान योजना सुरू करण्यात आली. या सन्मान योजनेचा लाभ तुम्हाला मिळाला का, असे आदित्य ठाकरे राज्यात विचारत फिरत आहेत. या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही हे त्यांच्या लक्षात आले तरी शिवसेना गप्प का?
महाराष्ट्र शासनाने महाराजांचे किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेतला. यावेळी शिवसेनेचे मंत्री गप्प का बसले? याचा अर्थ महाराजांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार शिवसेनेने गमावलेला आहे, असा आरोप त्यांनी केला.या सभेला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचेसमवेत महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार संजय कदम, सरचिटणीस अमोल मिटकरी, तालुकाध्यक्ष जयंत जालगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.शिवसेनेने किती उद्योग उभारले?शिवसेनेने कोकणासाठी काय दिले येथे किती उद्योग उभारले, कितीजणांना नोकऱ्या दिल्या असे प्रश्न डॉ. कोल्हे यांनी विचारले. शिवसेनेने केवळ भावनिक आवाहने करून येथे मते मिळवली, असा आरोपही त्यांनी केला.