रत्नागिरी : मुख्यमंत्री पदाच्या २४ महिन्यापैकी १८ महिने मंत्रालयात न गेलेले उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री असल्याचे टीकास्त्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोडले. शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार गतिमान असल्याचे सांगतानाच त्यांनी शिंदे गटासोबत ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत युती करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.तळकोकणातील संघटनात्मक कामाचा आढावा, पक्षाला बळकटी देणे यासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आले आहेत. शुक्रवारी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतानाच शिंदे फडणवीस सरकारचे कौतुक केले.राज्यात योजनाबद्ध काम करुन ४५ हून अधिक लोकसभेच्या आणि २०० पेक्षा अधिक विधानसभेच्या जागा मिळवू, असा दावा त्यांनी केला. इथून पुढे प्रत्येक निवडणूक शिंदे शिवसेनेसोबत युतीने लढवली जाईल, असे ते म्हणाले.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना लोकांमध्ये मिसळले नाहीत. त्यांनी जनतेशी फेसबुकवरुनच संवाद साधला. मंत्रिमंडळाच्या बैठकाही त्यांनी ऑनलाईनच घेतल्या. २४ महिन्याच्या आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात १८ महिने ते मंत्रालयात गेलेच नाहीत. आमदार म्हणून आपण विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल पाहिला आहे. आमदारांच्या पत्रावर या तिघांनीही तातडीने निर्णय घेतले असल्याचे आपण पाहिले आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही आमदाराच्या पत्रावर तत्काळ निर्णय घेतलेला नाही. त्यामुळेच आपण त्यांना निष्क्रिय म्हणत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.संजय राऊत यांनी आराम करावासध्या संजय राऊत काहीही बडबड करत आहेत. त्यापेक्षा त्यांनी दोन चार महिने आराम करावा, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला. त्यांनी डॉक्टरांना भेटायला हवे, असेही ते उपरोधिकपणे म्हणाले.
उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री, चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र
By मनोज मुळ्ये | Published: November 25, 2022 1:32 PM