मनोज मुळ्येरत्नागिरी : जाहीर सभेला झालेली गर्दी मतांमध्ये परिवर्तित होतेच असे नाही. पण ही गर्दी वातावरण निर्मितीला पोषक ठरते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खेडमधील सभाही वातावरण निर्मिती करणारी ठरली आहे. सगळ्या बाजूंनी पडझड होत असताना ही सभा ठाकरे शिवसेनेला बळ देणारी आहे. कोकणच्या बालेकिल्ल्यातील एक एक बुरुज ढासळत असताना ती सभा ठाकरे शिवसेनेला उत्साह देणारी ठरली आहे. मात्र हा उत्साह टिकवून ठेवणारी, कार्यकर्त्यांना जोडून ठेवणारी फळी आता ठाकरे शिवसेनेकडे नाही, हे वास्तव विसरून चालणार नाही.कोकणातला शिमगा सुरू होतानाच ठाकरे शिवसेनेने खेडमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी पक्षप्रवेश केला. या सभेला खूप मोठी गर्दी झाली होती. मुळात कोकण आणि शिवसेना हे नाते खूप जुने आहे. शिवसेनेने कोणीही उमेदवार द्यावा आणि कोकणातील लोकांना त्याला निवडून द्यावे, असे हे नाते अनेक वर्षांचे आहे. निवडणुकांसाठी म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कोकणात खूप कमी वेळा सभा घ्याव्या लागल्या होत्या.
बुरुज ढासळू लागले
- गेल्या काही वर्षात कोकणात बरेच राजकीय बदल झाले आहेत. राष्ट्रवादी, भाजप यांनी स्वत:ची जागा निश्चित केली आहे. आधी उदय सामंत, मग भास्कर जाधव आणि संजय कदम आणि नंतर शेखर निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खाते शून्यावर आणू दिलेले नाही. त्यामुळे आता शिवसेनेचे एकतर्फी वर्चस्व राहिलेले नाही.
- राष्ट्रवादीने शिरकाव केल्याने कोकणच्या बालेकिल्ल्यातील बुरुज आधीपासूनच ढासळू लागले आहेत. बऱ्याच काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या नसल्याने ग्रामीण पातळीवर काय स्थिती आहे, याचा अंदाज आलेला नाही. मात्र ठाकरे शिवसेना आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना आताची निवडणूक सहजसोपी नसेल.
- मूळ शिवसेनेचे कोकणातील दापोली, रत्नागिरी आणि सावंतवाडी हे तीन बुरुज ढासळले आहेत. या तीनही ठिकाणच्या मूळ शिवसेनेत दोन गट झाले आहेत. नवी शिवसेना सत्तेत असल्याने त्यांना कामांच्या माध्यमातून लोकांसमोर जाणे सोपे आहे, तर ठाकरे शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची जोड मिळाली असल्याने त्यांचा मार्गही काहीसा सोपा झाला आहे.