०२ शेखर विचारे.जेपीजी
लोकमत न्यूज नेटवर्क
गुहागर : तालुक्यातील वरवेली येथील प्रगतशील शेतकरी शेखर विचारे यांना शासनाचा ‘उद्यान पंडित २०१८’चा पुरस्कार जाहीर झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञान व सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन घेणारा प्रगतशील शेतकरी म्हणून या पुरस्कारासाठी विचारे यांची निवड झाली आहे.
शेखर विचारे यांनी तालुक्यातील वरवेली गावामध्ये पाच एकर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली आहे. यामध्ये दीड एकर क्षेत्रावर पांढरा कांदा लागवड केली आहे. यातून त्यांनी साडेतीन टन उत्पन्न घेतले आहे. दीड एकर क्षेत्रावर सुरण लागवड केली आहे तर दहा गुंठे क्षेत्रावर स्वीट कॉर्न (मका) उत्पादन घेतले आहे. मक्याचे साडेतीनशे किलो दाणे साठवण करुन त्यांची विक्री करणार आहेत. याचबरोबर अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत कृषी विभागाकडून शेडनेट घेऊन झेंडू, पालेभाजी आदी शेतीसंबंधित उत्पादनाची रोपे तयार करुन ती शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देणार आहेत.
तालुका कृषी विभागाने उद्यान पंडित पुरस्कारासाठी विचारे यांचा प्रस्ताव पाठवला होता. त्यांच्या कामाची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.