ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 2- उजनी धरण सध्या १0५ टक्के भरले असून, त्यात दौंड येथून उजनीत येणा-या विसर्गात वाढ होत असल्याने उजनीतून भीमा नदीत कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दोन दिवसांत उजनी धरण पाणलोट क्षेत्र व त्यावरील १९ धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. यामुळे उजनी धरणात पाणीसाठा वाढत आहे. त्यातच उजनीने शंभरी ओलांडून १0५ टक्के झाले आहे. या पार्श्वभूमीवर उजनीत येणा-या पाण्याचे नियोजन हे भीमा नदीत सोडून करावे लागणार आहे. यामुळे रात्री कोणत्याही वेळी भीमा नदीत पाणी सोडण्याची शक्यता आहे. यामुळे भीमा नदी काठावरील माढा, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ तालुक्यांतील गावांना सतर्कतेचा इशारा देऊन जीवित व वित्त हानी होणार नाही, यासाठी महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाला अलर्ट देण्यात आले आहेत. उजनी धरणाच्या वरच्या भागात असलेले सर्वच १९ धरण शंभर टक्के भरले आहेत. (वार्ताहर)
सीनेला येणार महापूर
उस्मानाबादमधून सोलापूर जिल्ह्यात येणा-या सीना नदीला ३५ हजार क्युसेक्सचा विसर्ग सोडल्यामुळे अन् नदीपात्र लहान असल्यामुळे सीनेला महापूर येणार असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या सीना कोळेगाव प्रकल्पामध्ये ९६ टक्के पाणीसाठा झाला असून, या प्रकल्पात वरून ३६ हजार क्युसेक्सचा विसर्ग सध्या येत आहे. यातून दुपारी चार दरवाजातून १६ हजार क्युसेक्सचा विसर्ग सोडला होता. मात्र त्यात वाढ करून २५ हजार ८00 क्युसेक्स केला आहे. रात्री १0 वा. तो ३५ हजार वर गेला आहे. यामुळे नदी काठच्या गावांना धोका निर्माण होणार आहे.
उजनीची सध्यस्थिती
एकूण पाणी पातळी ४९७.४५ मीटर
एकूण पाणीसाठा ३३९२.८१ दलघमी
उपयुक्त पाणीसाठा १५९0 दलघमी
टक्केवारी १0४.८0 टक्के
विसर्ग दौंड १६१९७ क्युसेक्स
बंडगार्डन ३२८0 क्युसेक्स