रत्नागिरी : कधी मुसळधार तर कधी विश्रांती, असा पावसाचा जिल्ह्यात खेळ सुरू आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेताच पुन्हा उकाड्याला प्रारंभ झाला. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण १९२.८० मिलीमीटर (सरासरी २१.४२ मिलीमीटर) पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे झाली आहे.
बंगालच्या उपसागरात सातत्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने अधूनमधून मुसळधार पाऊस पडत आहे. तर कधी पावसाची विश्रांती सुरू आहे. हवामान खात्याने २१ ते २८ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. सध्या काही तालुक्यांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे.
रविवार ते मंगळवार असे तीन दिवस जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. बुधवारी उत्तर रत्नागिरीत पावसाचा जोर होता. अन्य तालुक्यांमध्ये कधी जोरदार तर कधी तुरळक सरींनी पाऊस पडत होता. शुक्रवारी मात्र, पावसाने दिवसभर पूर्ण विश्रांती घेतली होती. रात्रीही तसा तुरळकच पाऊस पडला. पावसामुळे जिल्ह्यात कुठेही नुकसानीची नोंद झालेली नाही.