शिरगाव : मूल होत नाही, या नैराशेतून तरुण जोडप्याने आत्महत्या केल्याचा प्रकार चिपळूण तालुक्यातील अलोरे चेंबरी येथे घडला आहे. या प्रकारामुळे चिपळूण तालुक्यात खळबळ उडाली. संजय सदा निकम (३३) आणि सोनाली संजय निकम (२५) असे या दाम्पत्याचे नाव आहे.याबाबत सोनालीच्या आजीने शिरगाव पोलिस स्थानकात माहिती दिली. आदिवासी समाजातील संजय निकम व सोनाली यांचा चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांचा संसार सुखाने सुरू होता. दोघेही मिळेल त्या ठिकाणी मोलमजुरी करून संसार चालवीत होते. ते अलोरे चेंबरी येथे झोपडे उभारून राहत होते. त्यांच्यासोबत सोनालीचे आजी-आजोबा राहत होते.आपल्याला मूल होत नाही याचे शल्य त्यांच्या मनाला सतत टोचत होते. त्यामुळे दोघेही नाराज होते. घरात त्यांच्या बाेलण्यात सातत्याने मुलाचाच विषय येत असे. साेमवारी आजी-आजोबा बकऱ्या चरण्यासाठी रानात गेले होते. संजय आणि सोनाली कामावरून दुपारी घरी परतले. जेवून ते झाेपले. सायंकाळी चार वाजता बकऱ्या चारून आजी-आजोबा घरी परत आले. जेवण करण्यासाठी संजय आणि सोनल निकम यांना उठविण्यासाठी गेले असता ते खूप वेळा हाका मारून उठत नव्हते.आजी-आजोबांनी जवळ जाऊन त्या दोघांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला. त्यामुळे सोनालीच्या आजीने अलोरे शिरगाव पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या दोघांना नजीकच्या दवाखान्यात नेले. मात्र, त्यांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. दोघांनीही विष पिऊन आत्महत्या केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास अलोरे-शिरगाव पोलिस स्थानकाचे अंमलदार दिलीप पवार करीत आहेत.
मूल होत नसल्याने मनात शल्य, दांपत्याने टोकाचा निर्णय घेत संपवले जीवन; रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 11:41 AM