रत्नागिरी : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी यांची सोमवारी रत्नागिरीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चार तास चौकशी केली. आरोपी म्हणून रजिस्टरवर स्वाक्षरी करताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या तक्रारीनंतर राजन साळवी, त्यांची पत्नी अनुजा व मुलगा शुभम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अनुजा साळवी आणि शुभम साळवी यांच्या अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. तो न्यायालयाने मंजूरही केला. हा अंतरिम दिलासा देताना न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, साळवी कुटुंबीय चौकशीसाठी हजर होते. राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा, भाऊ आणि वहिनी असे पाचजण यावेळी हजर होते.सोमवारी दुपारी १ वाजल्यापासून ५ वाजेपर्यंत ही चौकशी सुरू होती. मात्र केवळ अनुजा साळवी यांचाच जबाब घेण्यात आला. उर्वरित लोकांची चौकशी मंगळवारी होणार आहे. चौकशी दरम्यान अनुजा साळवी यांनी रजिस्टरवर सही केली. मात्र आरोपी म्हणून ही स्वाक्षरी करताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरण: आमदार राजन साळवी यांच्या पत्नीची चार तास चौकशी
By मनोज मुळ्ये | Published: March 04, 2024 7:10 PM