रत्नागिरी : तब्बल साडेतीन कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरुन उद्धव ठाकरे शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी, तसेच त्यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम या तिघांविरुद्ध गुरुवारी सकाळी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून ही कारवाई करण्यात आली असून, या विभागाचे उपअधीक्षक सुशांत चव्हाण अधिक तपास करत आहेत.जवळपास सव्वा वर्षाहून अधिक काळ आमदार साळवी यांची चौकशी अलिबाग लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून सुरू आहे. यात त्यांची पत्नी अनुजा, मुलगा शुभम, त्यांचे भाऊ दीपक तसेच पुतण्या अथर्व याचीही चौकशी लाचलुचपत विभागाकडून करण्यात आली आहे.चालू महिन्यातच सर्वांचे जबाब नोंदवण्याचे काम संपले आहे. आमदार साळवी तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या मालमत्तेची कागदपत्रे तपासण्यात आली. त्यानंतर आता गुरुवार १८ रोजी सकाळी ९:०८ वाजता आमदार राजन साळवी, पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आमदार राजन प्रभाकर साळवी, अनुजा साळवी, शुभम साळवी (सर्व रा. साहेब बंगला, एमएसईबी ऑफिसच्या बाजूला, खालची आळी, रत्नागिरी) यांच्याकडे रत्नागिरी शहर हद्दीत व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऑक्टोबर २००९ ते ०२ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये असलेले ज्ञात उत्पन्न, खर्च व मालमत्ता विचारात घेण्यात येऊन, त्यांच्या ताब्यात ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त एकूण ३,५३,८९,७५२/- रुपये इतकी अपसंपदा म्हणजेच ११८.९६ % अपसंपदा संपदित केली असल्याचे स्पष्ट झाले आहे व त्याबाबतचा समाधानकारक खुलासा त्यांनी सादर केला नाही. त्यामुळे आमदार साळवी यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ (संशोधन २०१८) चे कलम १३(१)(ब) सह १३(२) प्रमाणे तसेच त्यांची पत्नी अनुजा व मुलगा शुभम यांनी नमूद मालमत्ता ही अपसंपदा आहे हे माहित असूनही जाणीवपूर्वक ती स्वतःच्या नावे धारण करून कब्जात बाळगणे कामी राजन साळवी यांना गुन्हा करण्यास प्रोत्साहन दिले. म्हणून रत्नागिरी शहर पोलिस ठाणे गुन्हा रजि नंबर २४/२०२४ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ (संशोधन २०१८) चे कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, असे या प्रकरणातील फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणाची सर्व कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनील लोखंडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनिल येरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीचे उपअधीक्षक सुशांत चव्हाण करत आहेत.
घरझडती सुरूगुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आमदार राजन साळवी यांचे घर, हॉटेल, कार्यालय अशा एकूण सात ठिकाणी घरझडती सुरू करण्यात आली आहे.