रत्नागिरी : खोल समुद्रातील मासेमारीवरील बंदी कालावधीत रविवारी १ ऑगस्टसपासून संपत असल्याने पर्ससिननेट नौका वगळता अन्य मासेमारी नाैकांद्वारे मासेमारीला प्रारंभ होणार आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून वादळी हवामानामुळे मासेमारी सुरू करण्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. तरीही काही नौका खोल समुद्रातील मासेमारीला जाण्यास सज्ज झाल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि वातावरणातील सततचे बदल यामुळे मागील दोन हंगामात मच्छीमारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. गतवर्षी पावसाळा लांबल्यामुळे समुद्रही खवळलेला होता. डिसेंबर महिन्यात बऱ्यापैकी वातावरण निवळले होते. मात्र, मे महिन्याच्या शेवटी तौक्ते वादळाने सर्वांनाच दणका दिला होता. चालू वर्षात मार्च ते मे महिना या कालावधीत कोरोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे घालण्यात आलेल्या बंदीचा फटका मासेमारीला बसला होता.
शासनाने १ जून ते २१ जुलै हा कालावधी मासेमारी बंदीसाठी निश्चित केला आहे. त्यानुसार १ ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होणार आहे. यामध्ये ट्रॉलर, गिलनेट, डोलनेट व इतर लहान नौकांद्वारे मासेमारी करण्यास शासनाची परवनगी आहे. पर्ससिननेटला १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर हे तीनच महिने मासेमारीसाठी देण्यात आले आहेत. मागील आठवड्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे अजूनही समुद्र खवळलेला आहे. वातावरणामध्ये स्थिरता येऊ लागली असली तरी अजूनही समुद्रात जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे खोल समुद्रात नौका नेणे धोकादायक ठरू शकते. तरीही अनेक नौका मालकांनी समुद्रात नौका नेण्याची तयारी करून ठेवली आहे. मात्र, वादळी वातावरणामुळे मासेमारीवर अनिश्चिततेचे सावट आहे.
------------------------
मासेमारी व्यवसायासाठी स्थानिक खलाशांची कमतरता असल्याने परराज्यातून तसेच नेपाळमधून खलाशी मागविण्यात येतात. यंदा परराज्य तसेच नेपाळी खलाशी अजून आलेले नाहीत. तसेच व्यवसायातील आर्थिक चणचण, डिझेल परतावा रखडल्यामुळे मागील हंगामात मच्छीमार आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यातच अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यामुळे अजूनही मासेमारी व्यवसाय समस्यांच्या गर्तेत आहे.