अडरे : भुयारी गटार योजना सर्वेक्षण आणि नगराध्यक्षांनी वापरलेल्या ५८/२ अधिकाराबाबत उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने हे अनभिज्ञच आहेत. चिपळूण शहरातील भुयारी गटार योजनेच्या सर्वेक्षणावरुन राजकारण तापले असतानाच शिवसेना नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत थेट आरोप केले आहेत. त्यामुळे उपनगराध्यक्ष व भाजपचे नगरसेवक भोजने यांनी याबाबत नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रावरुन खळबळ उडाली आहे. नगराध्यक्षांनी ५८/२ या अधिकाराचा वापर करुन एका एजन्सीला सर्वेक्षणाचा ठेका दिल्याचे भोजने यांना माहीत नसल्याचे या पत्रावरुन समोर आले आहे. मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांना दिलेल्या पत्रात उपनगराध्यक्ष भोजने यांनी एका व्हॉट्सअॅप ग्रुपचा दाखला घेत, ग्रुपवर आलेल्या पोस्टवरुन हे प्रकरण आपल्याला समजल्याचे म्हटले आहे. हा विषय गंभीर असून, याबाबतची खरी वस्तुस्थिती माझ्या निदर्शनास आणावी. अन्यथा पुढील होणाऱ्या परिणामांना आपण प्रशासनप्रमुख म्हणून जबाबदार असाल, असा इशारा भोजने यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे स्वपक्षातील नगरसेवक व खुद्द उपनगराध्यक्ष भोजने यांनाच या भुयारी गटार योजना सर्वेक्षणाबाबत कल्पना नव्हती, हे समोर आले आहे. (वार्ताहर)
भुयारी गटार सर्वेक्षण, उपनगराध्यक्ष अनभिज्ञ
By admin | Published: February 06, 2017 12:40 AM