लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या होमागार्डसना सध्या बंदोबस्त दिला जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील १७ होमगार्डस सेवेतून बाजुला झाले आहेत. काही खासगी सेवेत कार्यरत असले तरी काही बंदोबस्तावरच अवलंबून असल्याने त्यांच्यावर बेरोजगार राहण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात ४५७ होमगार्ड नोंदणीकृत आहेत. त्यापैकी ५० वर्षांवरील १७ होमगार्डस यांना कोरोनाच्या अनुषंगाने काम दिले जात नसल्याने आता ४४० सेवेत आहेत. यात ७५ महिलांचा समावेश आहे. सध्या ३५० जण कोरोना काळात बंदोबस्तात आहेत. मात्र, ५० वर्षांवरील होमगार्डसना शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार काम दिले जात नाही. यापैकी काहींनी अन्य खासगी आस्थापनात काम करायला सुरुवात केली आहे. मात्र, जे याच सेवेवर आहेत, त्यांच्यावर बेरोजगार म्हणून राहण्याची वेळ आली आहे.
पोलिसांच्या समकक्ष हा विभाग असूनही होमगार्डसना केवळ ६७० रुपये दिवसाचा बंदोबस्त भत्ता दिला जातो. सेवेत अनियमितता असल्याने प्रत्येक वेळी बंदोबस्त मिळत नाही. त्यातच आता ५० पेक्षा अधिक वय असलेल्यांना कोरोनामुळे बंदोबस्त मिळत नसल्याने ते बेरोजगार झाले आहेत.
५७ टक्के लसीकरण
कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात ३५० होमगार्डसना बंदोबस्त देण्यात आला आहे. त्यापैकी रत्नागिरीत पोलीस विभागाने मागणी केल्यानुसार १४१ होमगार्ड बंदोबस्तावर आहेत. त्यापैकी ८१ जवानांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातीलही आतापर्यंत जवळजवळ ९० टक्के जवानांनी पहिला डोस घेतला असून, ५० टक्के लोकांचा दुसरा डोसही पूर्ण झाला आहे.
गृहरक्षक दलाचा जवान कायमच दुर्लक्षित...
पोलिसांबरोबर निष्काम सेवा करणाऱ्या होमगार्डना शासनाने कायमच दुर्लक्षित केले आहे. तुटपुंजे वेतन, सेवेत अनियमितता यामुळे पोलीस विभागाशी समकक्ष असूनही गृहरक्षक दलाच्या जवानाला केवळ बंदोबस्तावेळी ६७० रुपये मानधन मिळते. पोलीस भरतीत आरक्षण असले तरी अनेक होमगार्डस् कायम सेवेपासून अजूनही वंचितच आहेत.
कोरोनाचा धोका ५० वर्षे वयावरील व्यक्तीला असल्याने त्या अनुषंगाने शासनाने ५० वर्षे उलटून गेलेल्या व्यक्तींना काम देऊ नये, असे आदेश काढले आहेत. त्यानुसार गृहरक्षक दलाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या कोरोनाच्या काळात बंदोबस्त असेल तिथे ५० वर्षांवरील होमगार्डसना बंदोबस्ताचे काम दिलेले नाही. जिल्ह्यात सध्या असे १७ होमगार्डस आहेत.
- एस. ओ. साळुंखे, प्रशासकीय अधिकारी, रत्नागिरी
मी सुमारे ३० वर्षे होमगार्डमध्ये होतो. ५० वर्षे झाल्याने कोरोनामुळे बंदोबस्त बंद केला आहे. सध्या बेरोजगार असून फक्त शेतीवरच सारा उदरनिर्वाह अवलंबून आहे. शासनाने आमचाही विचार करावा.
- ओ. सी. नामये, जावडे (ता. लांजा)
मी होमगार्डमध्ये होतो. मला बंदोबस्त असेल त्या दिवशी ६७० रुपये भत्ता मिळत असे. मात्र, ५० वर्षे झाल्याने आता मला शासनाच्या कोरोनाच्या नियमानुसार बंदोबस्त देणे बंद करण्यात आले आहे. सध्या मी तात्पुरत्या स्वरूपात एका बँकेत काम करीत आहे.
देवरूखकर, अलोरे