रत्नागिरी : स्वा. सावरकर यांना ब्रिटिशांनी रत्नागिरीतील जेलमध्ये ठेवले हाेते. त्या जेलमधील ती काेठडी पाहिल्यानंतर सावरकर यांच्या त्यागाची, देशप्रेमाबद्दल, देशाच्या अभिमानाबद्दल कल्पना येते, असे भावाेद्गार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे व्यक्त केले.केंद्रीय मंत्री नारायण राणे शुक्रवारी (१२ ऑगस्ट) रत्नागिरी दाैऱ्यावर आले हाेते. या दाैऱ्यात त्यांनी लाेकमान्य टिळक जन्मभूमी आणि स्वा. सावरकर यांना ठेवलेल्या काेठडीला भेट दिली. त्याठिकाणी नतमस्तक हाेऊन त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.ते म्हणाले की, सावरकर यांना ज्या काेठडीत ठेवले हाेते. तेथे त्यांना जवळजवळ दाेन वर्षे ठेवण्यात आले हाेते. त्या काेठडीतील जागा पाहिल्यानंतर त्यांच्या त्यागाची आपल्याला कल्पना येते. भारतीय स्वातंत्र्याला १५ ऑगस्टला ७५ वर्षे पूर्ण हाेत आहेत. या स्वातंत्र्यलढ्यामध्ये ज्यांनी याेगदान दिले आहे, त्याग केलेला आहे, बलिदान दिलेले आहे. त्यांच्या गावी, घरी जाऊन त्यांना अभिवादन करण्याचे धाेरण ठरविले आहे. लाेकमान्य टिळक यांचे जन्मस्थान, स्वा. सावरकर ज्या जेलमध्ये हाेते त्याठिकाणी जाऊन नतमस्तक हाेण्यासाठी हा दाैरा आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानातून प्रत्येक घराघरात तिरंगा जावा ही प्रेरणा दिली असून, ती घेऊन आम्ही आलाे आहाेत, असे केंद्रीय मंत्री राणे म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी आठ वर्षे देश सुरक्षित ठेवला पण देशातील लाेकांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम त्यांनी केले आहे. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारून देशाची प्रगती व्हावी, देश आत्मनिर्भर व्हावा म्हणून त्यांचे प्रयत्न आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात सेवक म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताे आहे.
नारायण राणेंनी टिळक जन्मभूमी, सावरकरांच्या काेठडीला दिली भेट, म्हणाले तेव्हा..
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 7:11 PM