अरुण आडिवरेकररत्नागिरी : पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांचे मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस नेहमीच समाजाभिमुख उपक्रम राबवत असतात. दीपावलीच्या मंगल व पावित्र्यपूर्ण वातावरणात पोलिसांनी भाऊबीजेची अनोखी भेट सर्वांना दिली. पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची उकल झालेनंतर परत मिळालेल्या मुद्देमालात स्त्री धनाचा समावेश असतो. त्याची पैशात किंमत होऊ शकत नाही, कारण त्यांत महिलांच्या आठवणी व भावना गुंतलेल्या असतात. त्यामुळे भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला हे स्रीधन न्यायालयाच्या परवानगीने महिला फिर्यादी भगीनींना परत केला. यातून संबधितांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद समाधान मिळवून देत होता. रस्त्यांवरील अपघात व त्यातील तरुणांचा अकाली मृत्यू संवेदनशील मनाला अस्वस्थ करतो. अपघातातील मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी हेल्मेटच्या वापरांबावत न्यायालयपण आग्रही आहे. मात्र अद्याप वाहनचालकांना हे बंधन जाचक वाटते. खरे तर आपली सुरक्षितता आपले हाती आहे याचा त्यावेळी नकळत विसर पडतो.
म्हणूनच महिला पोलिसांनी भाऊबीज साजरी करताना आपल्या भाऊरायांना हेल्मेटची भेट देऊन वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे वचन त्यांचेकडून घेतले. यावेळी शहरातून काढलेल्या प्रबोधन फेरीत पोलीस अधीक्षक प्रणय अशोक व अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत सामील झाले होते.