दिनेशचे फोनवरील बोलणे संपल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये एका आलिशान गाडीमध्ये आकर्षक पोषाखामध्ये एक तरुण दिनेशला भेटण्यासाठी आला होता. प्राथमिक पाहणीवरून तो उच्च न्यायालयात वकील असावा, असे मला वाटले. मात्र, तो तरुण दिनेशच्या व माझ्या पायाशी नतमस्तक झाला. तो दिनेशचा विद्यार्थी (शिष्य) अक्षय होता. सध्या तो पेशाने डॉक्टर आहे. तो मुंबईमध्ये एका नामांकित हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करण्याचे कार्य करत आहे. विनावेतन ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या आपल्या गुरूला वेतन मिळावे, या एकाच हेतूने अक्षय या शिष्याने आपल्या गुरूला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी प्रवृत्त केले होते. वकिलासाठी लागणारी सर्व फी या शिष्याने आपल्या गुरूला गुरुदक्षिणा म्हणून या भेटीत दिली होती.
‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवै नमः’ प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत गुरूला देवासमान स्थान आहे. संत कबीरांनी तर गुरूचे महत्त्व स्पष्ट करताना ‘सब धरती कागज करू, लिखनी सब बनराय, सात समुद्र की मसि करूँ, गुरु गुण लिखा न जाए’ असे म्हटले आहे. त्याचा अर्थ असा आहे की, ‘पृथ्वीचा जरी संपूर्ण कागद केला व समुद्राची शाई केली तरीही गुरुचे गुण लिहिता येणार नाहीत.’ गुरु हा आपल्या ज्ञानाने अंधकार दूर करतो. परीस हा लोखंडाचे सोने करतो त्याचप्रमाणे गुरु हा शिष्याला आपल्या समान बनवतो. अक्षयसारखे विद्यार्थीच खऱ्या अर्थाने विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांची खरी संपत्ती आहेत. मुंबई उच्च न्यायालयामध्ये दिनेशच्या बाजूने निकाल लागल्यास अक्षयसारख्या शिष्याने आपल्या आवडत्या गुरूला गुरुपौर्णिमेनिमित्त दिलेली खरी गुरुदक्षिणा ठरेल.
- प्रा. हनुमंत लोखंडे, आडिवरे हायस्कूल, राजापूर