शिरगाव : आपले सर्व अवयव व्यवस्थित असताना जीवनाकडे बघण्याची दृष्टी विकसित नसल्याने गोंधळ निर्माण होतो. पण, नियतीने महत्वाचे अवयव काढून घेतले तरी कष्टाच्या जोरावर उदरनिर्वाह करणारे दोन दिव्यांग जीव गुरुवारी विवाह बंधनात एकरूप झाले. चिपळूण तालुक्यातील वेहेळे गावच्या नीलेश पाटकर या तरुणाने रेहेळे गावातील भारती बामणे हिला आपली जीवनसाथी बनवत समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे.चिपळुणातील ए. सी. बी. इंग्लिश मीडियम स्कूल येथे रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीने आमदार शेखर निकम व चंद्रकांत भोजने यांच्या सहकार्याने अशोक भुस्कुटे व अश्विनी भुस्कुटे यांच्या पुढाकाराने हा शुभ विवाहाचा सोहळा घडवून आणला.
दिव्यांग मुलगी म्हणून आपल्यासारख्या पीडित अनेकांसाठी अशोक भुस्कुटे यांच्यासमवेत ९ वर्षे काम करणाऱ्या भारतीने संसार करावा, असे वाटू लागल्याने वराचा शोध सुरू झाला. विविध अपंग मेळावे झाले. पण अपेक्षित काही घडले नाही. ३ डिसेंबर रोजी आयोजित दिव्यांग वधू-वर मेळाव्याप्रसंगी भारती कार्यक्रम संयोजनात पुढे असताना नीलेश यांनी तिची चपळता पाहिली.
कृषी विद्यापीठाच्या कामात यंत्रात आपला एक पंजा निकामी झालेल्या नीलेशने भुस्कुटे यांच्याशी संपर्क करून तिला मी स्वीकारेन, अशी कबुली दिली. तोही कष्टाने बकरी पालनाचा व्यवसाय करत असल्याचे पाहून मने जुळली आणि लग्न ठरले.माजी सभापती पूजा निकम यांनी १६ रोजी मुलीच्या आंदनाची भांडी भेट देत पहिली हळद लावली आणि गुरुवारी अनेक दिव्यांग बंधू - भगिनी, दोन्ही घरचे नातेवाईक यांच्या उपस्थितीत लग्न झाले.
आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आमदार शेखर निकम यांनी स्वतः हजर राहून वधू-वर यांना शुभेच्छा दिल्या. विवाह सोहळे अनेक होतात. पण या विवाहाने आपल्या डोळ्याचे पारणे फेडल्याची प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी व्यक्त केली.