खेड : जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दि. ३ ते ९ जून या कालावधीत निर्बंध लागू करण्यात आले हाेते़ हे निर्बंध जिल्हाधिकारी यांनी शिथिल केल्यामुळे गुरुवारी खेडमध्ये अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. बाजारपेठ पूर्णपणे उघडली नसली तरी व्यापाऱ्यांनी पावसाळ्याच्या तयारीसाठी लगबग सुरू केली हाेती.
सुमारे एक आठवडा अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त बंद असलेली दुकाने व्यापाऱ्यांनी सकाळी लवकर उघडून साफसफाई करण्यास सुरुवात केली. पावसाची रिमझिम सुरू असल्याने व ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू झाल्याने बाजारपेठेत गर्दी कमी होती. परंतु काही जण पावसाळी खरेदीसाठी बाजारात आले हाेते. दुचाकी व चारचाकी वाहनांची गर्दी सकाळी काही तास रस्त्यावरून दिसत होती़ परंतु दुपारनंतर मात्र बाजारपेठ पुन्हा बंद झाली.
दि. ३ पासून बँकेतील व्यवहार केवळ शेतकऱ्यांसाठी सुरू असल्याने अनेकांनी बँकेतील त्यांचे थांबलेले व्यवहार पूर्ण करण्यासाठी गर्दी केली होती. दि. १० ते १२ या कालावधीत हवामान खात्याने जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने, स्थानिक पालिका व तालुका प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन ध्वनिक्षेपकद्वारे दवंडी देऊन केले आहे.
----------------------------------
लाॅकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर खेड येथील बाजारपेठ सुरू झाली हाेती़
(छाया : हर्षल शिराेडकर)