राजापूर : तौक्ते चक्रीवादळामुळे तालुक्यात रविवार आणि सोमवारी झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे अत्यंत धीम्या गतीने आणि नियोजनशून्य पद्धतीने सुरू असलेल्या महामार्ग चौपदरीकरण कामामुळे महामार्गावर एसटी स्टँड तसेच कोदवली साईनगर परिसरात व राजापूर-शिळ मार्गावर दलदल निर्माण झाली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य पादचारी व वाहनचालकांना बसत आहे. मान्सूनपूर्व पावसाने महामार्गाच्या नियोजन शून्य कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पावसाळ्यापूर्वी योग्य ती खबरदारी न घेतल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या या मनमानीकडे प्रशासनातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोयीस्करपणे केलेले दुर्लक्ष भविष्यात अनेकांच्या जीवावर बेतणार आहे़ गेले दोन ते तीन वर्षे तालुक्यात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, कोकणातील भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थितीचा अंदाज नसलेल्या महामार्ग व्यवस्थापनाचे नियोजन फसल्याने गत दोनवर्षी पावसात माेठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला होता.
मात्र, यावेळी जिल्हा प्रशासनाने ताैक्ते चक्रीवादळामुळे तालुक्यात वादळी वारे आणि पर्जन्यवृष्टी होण्याचे संकेत दिले असताना मोठ्या प्रमाणात पाऊस झालेल्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी कोणतेच नियोजन केलेले नाही़ त्यामुळे सध्या काम सुरू असलेल्या कोदवली पेट्रोलपंप ते एसटी डेपो सारंग बाग परिसरात महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले हाेते़ माेठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास वा महामार्गावर पाणी तुंबल्यास पर्यायी व्यवस्थाच व्यवस्थापनाकडे नसल्याने त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे तर महामार्गावर अर्जुना नदीवर पुल बांधण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. गतवर्षी नदीपात्र आणि कोंढेतड भागाकडील पिलरचे काम पावसाळ्यापूर्वी आटोपण्यात आले होते तर नदीअलीकडील शीळ मार्गावर पिलरचे काम पावसाळ्यानंतर हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी नदीपात्रात पूर्णपणे भराव टाकून पाणी अडविण्यात आले तर नदीपात्रातूनच पर्यायी मार्ग काढण्यात आला आहे. गेले वर्षभर अत्यंत धीम्या गतीने हे काम सुरू असून एका पिलरच्या बांधकामासाठी वर्षभर नदीपात्र अडविण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी काम सुरू असताना भराव्यासाठी टाकण्यात आलेल्या मातीमुळे दलदल निर्माण झाली आहे. त्यातून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे़