लोकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : माजी मंत्री, शिवसेनेचे प्रवक्ते, आमदार भास्कर जाधव यांच्या प्रयत्नातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विद्यमाने गुहागर मतदारसंघासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका कामथे उपजिल्हा रुग्णालयाकडे सुपुर्द करण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र जोरात वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही प्रचंड वेगाने रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णवाहिकेची आवश्यकता सर्वाधिक असते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अनिल परब यांनी नुकतेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींशी संवाद साधला होता. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी कामथेसाठी ॲम्ब्युलन्सची आवश्यकता असल्याचे नमूद केले होते. आमदार भास्कर जाधव यांनीही त्याअनुषंगाने पत्रव्यवहार केला होता.
जाधव पितापुत्रांची ही मागणी तत्काळ मान्य करण्यात आली.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विद्यमाने महाराष्ट्रात १०० रुग्णवाहिका वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. त्यापैकी एक रुग्णवाहिका गुहागर मतदारसंघासाठी तत्काळ देण्यात आली आहे. सोमवारी ही रुग्णवाहिका चिपळूणमध्ये दाखल झाली. आमदार जाधव यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेची किल्ली तत्काळ कामथे रुग्णालयाचे प्रभारी तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय सानप यांच्याकडे सुपुर्द केली. कोरोना रुग्णवाढीच्या काळात ही रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने मोठी गैरसोय दूर झाली आहे.
...........................
आमदार भास्कर जाधव यांनी कामथे रुग्णालयाचे डॉ. अजय सानप यांच्याकडे रुग्णवाहिकेची चावी सुपूर्द केली.