चिपळूण - युपीएससी परिक्षेत भारतात तेरावी व महाराष्ट्रात पहिली आलेली प्रियंवदा अशोक म्हाडदळकर हिच्या यशाने चिपळूणकरांचे नाव रोशन केले आहे. अशोक म्हाडदळकर हे कोकण विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून रत्नागिरी येथे निवृत्त झाले असून चिपळूण येथील विरेश्वर कॉलनी त्यांचे निवासस्थान आहे. प्रियंवदा हिने मुंबई येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्हीजेटीआय मुंबई येथे बीटेक पूर्ण केल्यावर आय एम बंगलोर येथून एम.बी.ए पदवी संपादन केली आहे.
मुळची वेंगुर्ला उभादांडा येथील रहिवासी असलेल्या प्रियवंदा म्हाडदळकर हिचे आजोबा साबाजी म्हाडदळकर हे १९३६ मध्ये नोकरीच्या निमीत्ताने चिपळूणात आले आणि कायमचे स्थायिक झाले. शहरातील विरेश्वर कॉलनी येथे त्यांचे घर आहे. त्यांच्या चार मुलांपैकी तिघेजण चिपळूणात स्थायीक असले तरी प्रियवंदा हिचे वडील अशोक म्हाडदळकर हे गेल्या अनेक वर्षापासून मुंबईत नोकरीनिमीत्ताने वास्तव्यास आहेत.
प्रियवंदा हिने व्हिजेटीआयमधून अभियांत्रिकीची पदवी, आयआयएम बंगळुरु येथून व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर पदवी (एमबीए), खासगी क्षेत्रातील वाटचालीसाठी खणखणीत म्हणावी अशी पात्रता असूनही प्रियंवदा म्हाडदळकरला प्रशासकीय सेवेने खुणावले. प्रियंवदाला केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेण्यात येणाऱ्या लोकसेवा परीक्षेच्या गुणवत्ता यादीत देशात तेरावे स्थान मिळाले आहे.
प्रियंवदाने मुंबईच्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेतून अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी देशातील अव्वल मानल्या जाणाऱ्या आयआयएमपैकी बंगळुरू आयआयएममधून तिने व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर पदवी (एमबीए) घेतली. दरम्यान विद्यार्थी आदान प्रदान योजनेमधून जर्मनीतील विद्यापीठातही काही महिने शिक्षण घेतले. इन्व्हेस्टमेंट बँकिंगसारखा खासगी क्षेत्रात मागणी असलेला विषय असूनही शासकीय सेवेत येण्याचे तिने ठरवले. घेतलेले शैक्षणिक कर्ज फेडण्यासाठी काही काळ नोकरी केल्यानंतर तिने लोकसेवा परीक्षेची तयारी सुरू केली. त्यासाठी जुलै 2020 मध्ये नोकरी सोडली. त्याचवर्षी परीक्षेचा अर्जही भरला. मात्र पुरेशी तयारी न झाल्याने परीक्षा दिली नाही. गेल्यावर्षी (2021) पुन्हा अर्ज भरला आणि देशातील अव्वल उमेदवारांमध्ये स्थान पटकावले.
प्रियवंदाच्या यशाचा खडतर प्रवासपरीक्षेच्या तयारीसाठी वैकल्पिक विषयासाठी ऑनलाइन शिकवणीचा आधार घेतला. मात्र बाकी पूर्णपणे स्वयंअध्ययन केल्याचे प्रियंवदाने सांगितले. वडील शासकीय सेवेत असल्याने प्रशासकीय सेवेबाबत उत्सुकता होती. फक्त नोकरीच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा व्यवस्थेसाठी, समाजासाठी उपयोग करण्याची इच्छा होती. मात्र बाकीही क्षेत्र खुणावत होती. एमबीए केल्यावर परीक्षेच्या तयारीसाठी वेळ देऊ शकू असा आत्मविश्वास आला. त्यानंतर पूर्णवेळ परीक्षेची तयारी सुरू केली, असे प्रियंवदाने सांगितले.
म्हाडदळकर कुटुबियांचे चिपळूणशी नाते गेल्या ८५ वर्षापासून म्हाडदळकर कुटुबियांचे चिपळूणकरांशी नातं जोडलेले आहे. सद्यस्थितीत प्रियवंदाचे वडिल अशोक म्हाडदळकर यांचे तिन बधू चिपळूणात स्थायिक आहेत. यातील पुरूषोत्तम म्हाडदळकर हे सार्वजनिक बांधकाम, रमेश म्हाडदळकर हे पॉलिटेक्निक कॉलेज, मनोहर म्हाडदळकर हे एस.टी वाहक म्हणून सेवानिवृत्ती झाले आहे. त्यांना एकच बहिण असून ती खेड येथे स्थायिक आहे. विशेष म्हणजे या कुटुबांत सर्व भावडांना मुली असून त्याचा त्यांना अभिमान असल्याचे मनोहर म्हाडदळकर यांनी सांगितले.