लांजा : हिंदू - मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या सय्यद चाँदशहा बुखारी दर्गा येथील उरूस या वर्षी कोेरोनामुळे साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती दर्गा व्यवस्थापक कमिटीने दिली.लांजातील चाँदशहा बुखारी बाबा दर्गा कमिटी आणि मानकरी यांची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लांजा शहरातील सय्यद चाँदशाह बुखारी बाबांचा उरूस २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
दरवर्षी हा उरूस तीन दिवस केला जातो. यंदाही तो २४,२५ व २६ फेब्रुवारी असा तीन दिवस साजरा होणार होता. परंतु कोरोना महामारीचा प्रादुर्भाव होऊ नये, याची खबरदारी म्हणून यावर्षीचा उरुस एकच दिवस साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. धार्मिक विधी पुजारी आणि मानकरी यांच्या उपस्थितीत पार पाडले जाणार आहेत.दरवर्षी या उरुसाकरिता मुंबई, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. त्यामुळे फार मोठी गर्दी होते. मात्र कोरोनाचे संकट टळले नसल्याने यावर्षी उरूस मोठ्या प्रमाणात साजरा न करता प्रमुख मानकरी आणि पुजारी यांनीच धार्मिक विधी करण्याचे निश्चित केले आहे. त्या दिवशी कोणत्याही प्रकारची दुकाने लावण्यास मनाई करण्यात आली असून, भाविकांनी दर्शनासाठी किंवा नैवैद्यासाठी एकत्रित जमू नये, असे आवाहन चाँदशहा दर्गाचे मानकरी आणि दर्गा कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.