शोभना कांबळे
रत्नागिरी : खोकल्याचे औषध, पोटदुखीवरचे औषध, झोपेच्या गाेळ्या यासारख्या औषधांचा वापर नशेसाठी करण्याचे प्रमाण तरुणाईत वाढू लागले आहे. मुंबई - पुणे या शहरांत संख्या जास्त असली तरी रत्नागिरीतही याचे लोण हळूहळू पसरत आहे.
सर्दी, खोकल्यांमधील औषधात इफेड्रिनमधील सुडो इफेड्रिन तसेच मेफेड्रिनही काही प्रमाणात वापरले जाते. मात्र, नशेच्या बाजारात इफेड्रिनचा वापर क्षमतेपेक्षा कैक पटीने अधिक असल्याने त्याला प्रतिबंधित औषधांचा दर्जा देण्यात आला आहे. इफेड्रिन शरीरात स्वीकारण्यास सुरुवात केल्यास त्याची शरीराला सवय लागते. त्यातून वारंवार इफेड्रिनचे सेवन करण्यास व्यक्ती उत्सुक होतात. मात्र, त्याचे शरीरावर तात्काळ विपरीत परिणाम दिसू लागतात.
याचप्रमाणे पोटदुखी, झोपेच्या गोळ्यांचाही वापर नशेसाठी केला जातो. त्यामुळे या औषधांवर बंदी घालण्यात आली असून ती डाॅक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय औषध विक्रेत्यांना न देण्याच्या सूचना औषध प्रशासनाकडून दिल्या आहेत.
प्रिस्क्रीप्शनशिवाय औषधे विकायला नकाे
- इफेड्रिनमधील सुडो इफेड्रिन तसेच मेफेड्रिन याचा वापर सर्दी, खोकल्यांमधील औषधात कमी प्रमाणात केला जातो.
- मात्र, इफेड्रिन, झोपेच्या गोळ्या, खोकल्याच्या औषधातील कोडीन यासारख्या औषधांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर नशेसाठी केला जात असल्याने ही औषधे प्रिस्क्रीप्शनशिवाय दिली जात नाहीत.
यातूनच वाढते गुन्हेगारी...
- सर्दी - खोकला, पोटदुखी यावर आराम मिळावा, यादृष्टीने विशिष्ट घटक संमिश्र करून यावरील औषध तयार केले जाते. मात्र, याचा वापर हल्ली नशेसाठी केला जात आहे.
- या औषधांचा उपयोग योग्यरीत्या न होता, अपायकारक कारणासाठी होत असल्याने यावर बंदी घालण्यात आली आहे. ही औषधे प्रिस्क्रीप्शनशिवाय मिळत नसल्याने ती काळ्या बाजारातून खरेदी करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. यातूनच गुन्हेगारी वाढत आहे.
खोकल्याचे औषध, झोपेच्या गोळ्यांतूनही नशा...
सर्दी - खोकल्यांवरील औषधांमध्ये आजारांपासून आराम मिळावा, यासाठी कोडीनसारख्या औषधांचा वापर केला जातो. मात्र, त्याची मात्रा वाढली तर त्याचा मेंदूवर परिणाम होतो. नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी काही जण झोपेच्या गोळ्यांची मागणी करतात. मात्र, या गोळ्यांचेही सेवन नशा येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केले जाते. मुंबई - पुण्यासारख्या शहरात याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. रत्नागिरीत सध्या तरी ही संख्या कमी आहे. या औषधांचा वापर अधिक प्रमाणावर होत नसल्याने उपचारासाठी पुढे येणाऱ्यांची संख्या कमी आहे. मात्र, रत्नागिरीतही हे लोण पोहोचलेले आहे. - डाॅ. अतुल ढगे, मानसोपचारतज्ज्ञ, रत्नागिरी
खिशाला परवडणारी जीवघेणी नशा
प्रतिबंधित औषधांचा नशेसाठी वापर वाढत आहे. बाजारातील सहज उपलब्धता तसेच सेवन करणेही सहजशक्य असल्याने त्यांचा वापर बेसुमार पद्धतीने होत आहे. खोकल्यासाठी घेतल्या जाणाऱ्या कफ सिरपचा व्यसनाधीनांकडून नशेसाठी पूर्वापार वापर होतो. या औषधांच्या किमती कमी असल्याने त्याचा वापर जीवघेण्या नशेसाठी केला जात आहे.