शोभना कांबळेरत्नागिरी : येथील डॉ. मुकुंद पानवलकर यांनी आपल्या बागेतच कंपोस्ट खत निर्मितीचा प्रयोग सुरू केला असून, यातून वर्षभरात सुमारे टनभर खत निर्माण होत आहे. विशेष म्हणजे डॉ. पानवलकर हे गेल्या सहा वर्षांपासून प्लास्टिक वगळून सर्वप्रकारच्या कचऱ्यापासून खताची निर्मिती करीत आहेत.लहानपणापासूनच बागकामाची आवड असलेल्या डॉ. पानवलकर यांनी आपल्या घराभोवती बाग तयार केली असून, त्यात विविध प्रकारची फुलझाडे तसेच काही फळझाडेही लावली आहेत. यामध्ये काही विदेशातील दुर्मीळ फुलांचाही समावेश आहे. या बागेला बाहेरून माती किंवा खत न आणता, ते स्वत:च तयार करीत आहेत.
या सेंद्रीय खताच्या निर्मितीसाठी घरातील कचरा, भाज्यांचे टाकाऊ अवशेष, देठ, पडलेली पाने-फुले, फळांची नको असलेली साले, याचबरोबर वापरलेली चहा पावडर, अंड्याची टरफले, गवत, कागदाचे तुकडे, पुठ्ठे अगदी निर्माल्य आदी वस्तूंचा समावेश त्यांच्या खत निर्मितीत आहे.
नगर परिषदेच्या घंटागाडीतून फक्त प्लास्टिकचा कचराच आम्ही देतो, असे डॉ. पानवलकर सांगतात. खत तयार करण्यासाठी अगदी फुटलेली बादली वा कुंडीचाही वापर ते करतात.आता स्वतंत्र खत निर्मितीसाठी त्यांनी सुमारे तीन फूट उंचीच्या लोखंडी जाळीचा पिंजरा करून घेतला आहे. त्याभोवती नायलॉनची जाळी शिवून घेतली आहे. यात हा सर्व कचरा टाकला जातो. खत तयार होण्यास सुमारे दीड - दोन महिन्यांचा कालावधी लागतो.
घरासभोवताली असलेल्या बागेला हे खत वर्षभर पुरते. पानवलकर दाम्पत्याला प्रवासाची प्रचंड आवड असल्याने देश - विदेशातील विविध प्रकारची फुले, फळे यांची रोपे त्यांच्या बागेत दिसून येतात. एवढेच नव्हे तर डॉ. पानवलकर त्यापासून नव्या रोपांची निर्मितीही करतात.वाढदिवसाचे औचित्य साधून किंवा भेट म्हणून ही रोपे देताना त्यांना विलक्षण आनंद होतो. या रोपांची किंमत बाहेर २०० ते ५०० रूपयांपर्यंत असल्याचे ते सांगतात.गुलाबाची आवड असलेल्या पानवलकर दाम्पत्याच्या या बागेत २५ प्रकारच्या गुलाबांची १०० रोपे लावलेली आहेत. आपल्याकडे विदेशातील रोपे जगत नाहीत, असा समज आहे. मात्र, पानवलकर दाम्पत्याने हा समजही खोटा ठरवला आहे.
या बागेत विविध प्रकारची जास्वंद, गुलाब, सदाफुली, जरबेरा बरोबरच अॅडेनिअम, आर्किडेझ, युफोर्बिया, पेन्टास, इम्पेशन्स, डान्सिंग डॉल आदी परदेशी फुलेही बहरलेली आहेत.त्याचबरोबर घराच्या आवारात १५ नारळाची झाडे त्याचबरोबर फणस, सोनकेळी, लाल केळी, आवळा, लिंब, रायआवळा, पेरू, पेर, अंजीर, ड्रॅगनफ्रूट, विलायती काजू, अननस, बोन्साय चिकू आदी झाडे या दोघांनी स्वत: आपल्याकडील कामगाराला मदतीला घेऊन लावलेली आहेत.बागेत नवीन रोप लावताना त्यासाठी मातीचा वापर करायलाच हवा, असे नाही. डॉ. पानवलकर आपल्या बागेत रोपे लावण्यासाठी नारळापासून तयार केलेले कोको पीठ (ते सध्या केरळहून मागवतात) वापरतात. त्यात नारळाच्या सोडणांचे तुकडे टाकतात. यातूनही चांगल्या प्रकारची रोपे येत असल्याचे डॉ. पानवलकर सांगतात.परसदारी केली बागरत्नागिरीतील ८३ वर्षीय डॉ. पानवलकर तसेच त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता या दोघांनाही बागेत काम करण्याची आवड आहे. स्मिता पानवलकर यांनीही परसदारी छोटीशी बाग केली असून, त्यात विविध फुलांबरोबरच विविध फळबाज्या, पालेभाज्या, शेंगभाज्या केल्या आहेत. त्यामुळे भाज्या घरच्या घरीच उपलब्ध होतात. त्यांच्या बागेतही त्या सेंद्रीय खताची निर्मिती करीत आहेत.