लोकमत न्यूज नेटवर्क
साधारणपणे १० ते ११ महिन्यांच्या नारळ खोबऱ्याच्या किसापासून दूध काढून ते शिजवल्यानंतर जे तेल प्राप्त होते, त्याला व्हर्जीन कोकोनट ऑइल म्हणतात. नारळाच्या खोबऱ्यापासून काढण्यात येणाऱ्या तेलापेक्षा हे तेल मात्र भिन्न असते. यामध्ये कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. शिवाय हे तेल नैसर्गिक सर्वश्रेष्ठ लार्विक आम्लाचा स्रोत आहे.
व्हर्जीन कोकोनट ऑइल हे एक गुणवंत तेल मानवाच्या जीवनात अतिशय महत्त्वाचा भाग असून, ते जीवनाचा विविध अवस्थेमध्ये विविध प्रकारे उपयोगात आणले जाते. तेल म्हटले की, सोयाबीन, भुईमूग, मोहरी, तीळ, करडई अथवा कापूस (सरकी) तत्सम घटकांपासून बनविलेले असते आणि त्याचा आहारात वापर केला जातो; परंतु नारळापासून तयार केलेले व्हर्जीन कोकोनट ऑइल अत्यंत बहुगुणी आणि बहुपयोगी तेल आहे.
कल्पवृक्ष म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग मनुष्य प्राण्यासाठी मौल्यवान आहे. नारळापासून तयार केलेल्या खाद्यपदार्थाला जगात ‘सुपर फूड’ म्हणून ओळख प्राप्त झाली आहे. अलौकिक अशा नारळापासून मिळणाऱ्या फॅटी ॲसिडचा उपयोग आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक आहे.
व्हर्जीन कोकोनट ऑइल तेलाचे आहारातील महत्त्व जवळपास सर्वच देशातील शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. त्याचे महत्त्व आता लोकांना माहीत झाल्यानेच व्हर्जीन कोकोनट ऑइल या तेलाचा उपयोग मानवी जीवनात करण्यात येत आहे. त्याचे खाद्य व अखाद्य पदार्थात वर्गवारी केलेली आहे. खाद्यपदार्थ वर्गवारीमध्ये, व्हर्जीन कोकोनट ऑइल हे आहारातील महत्त्वाचा ऊर्जा स्रोत आहे. हे स्वयंपाकात पदार्थ तळण्यासाठी वापरले जाते. ज्यामध्ये अपवादात्मक अशी खवटपणा प्रतिकारशक्ती असून, ते आहाराचे स्वाद वाढविण्यास मदत करतात, तसेच त्याच्या न बदलण्याच्या विशिष्ट अशा लवचिकता गुणधमार्मुळे त्याचा वापर चीज व आइस्क्रीममध्ये पर्यायी केला जातो. अखाद्य पदार्थ वर्गवारीमध्ये, त्वचा व केसांना लावण्यासाठी वापर, ॲरोमाथेरपी व मसाज ऑइल म्हणून वापर व सौंदर्यवर्धक आणि त्वचेस उपयुक्त म्हणून वापर केला जातो. नारळ पाणी रुग्णांना देण्याचा डॉक्टर सल्ला देतात तशाचप्रकारे आता व्हर्जीन कोकोनट ऑइलसुद्धा नारळ पाण्यापेक्षा उपयुक्त ठरत आहे. व्हर्जीन कोकोनट ऑइलमध्ये जीवाणू प्रतिबंधक, विषाणू प्रतिबंधक व रोगप्रतिकारक क्षमता वाढविणारे गुणधर्म उपलब्ध आहेत.
- डॉ. वैभव शिंदे, अधिष्ठाता, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र,
भाट्ये- रत्नागिरी.
रक्तदाब नियंत्रणात
नारळ पाण्यामुळे पोटातील जळजळ, अल्सर, कोलायटिस, आतड्यांमधील जळजळ यासारख्या पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. शरीरास ऊर्जा प्राप्त होत अशक्तपणा, थकवा, चक्कर समस्यांतून सुटका होते. नारळ पाण्यात ‘क’ जीवनसत्त्व, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
रोगप्रतिकारशक्ती
नारळ पाणी सेवनामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होतो. नारळाचे पाणी सकाळचे सेवन अधिक चांगले मानले जाते. यावेळी मानवी शरीर सर्व पोषक द्रव्य शोषून घेते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. नारळाच्या पाण्याने चेहरा धुतल्यामुळे टॅनिंग कमी होते आणि चेहरा थंड राहतो.
विविध पोषक घटकांनी युक्त
नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट, पोटॅशियम, लोह मॅगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे आणखी बरेच पौष्टिक घटक असतात. नारळ पाण्यामध्ये ९४ टक्के पाणी असते. त्यात चरबीचे प्रमाण खूप कमी आहे. २५० मि.लि. नारळाच्या पाण्यात कार्बाचे प्रमाण-९ ग्रॅम, फायबर-३ ग्रॅम, प्रथिने-२ ग्रॅम, व्हिटॅमिन सी- १० टक्के, मॅग्नेशियम-१७ टक्के, सोडियम- ११ टक्के, कॅल्शियम- ६ टक्के असते.