लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : अलिकडच्या काळात विविध कारणांमुळे आत्मसंरक्षणासाठी शस्त्रे बाळगणे प्रतिष्ठेचे झाले आहे. रत्नागिरी जिल्हा तसा शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जात असल्याने तसा शस्त्राचा गैरवापर करण्याच्या घटना अगदीच अल्प आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आत्मसंरक्षणासाठी शस्त्र वापरणाऱ्यांचीही संख्या कमी आहे. जिल्ह्यात जून २०२१ अखेर १,३६२ जणांकडे आत्मसंरक्षणासाठीच्या शस्त्राचे परवाने आहेत.
काहीवेळा व्यक्तीला पूर्ववैमनस्यातून जीवाला धोका आहे, असे वाटत असते, त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मागितला जातो. राजकीय हेव्यादाव्यातूनही काहींना परवाना हवा असतो. काही व्यावसायिकांना समव्यावसायिकांकडून धोका वाटतो, काहींना मालमत्तेला धोका असल्याचे वाटते. त्यामुळे या व्यक्ती आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मागू शकतात. मात्र, शस्त्र परवाना देताना त्याचा गैरवापर होण्याचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाला अधिक खबरदारी घेऊनच परवाने द्यावे लागतात. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यामुळे प्रशासनाने अधिक खबरदारी घेत परवाना अत्यावश्यक बाबींसाठी देण्यास सुरूवात केली आहे.
सध्या अद्ययावतीकरणाचे काम सुरू आहे. परवानाधारक असलेल्या मयत व्यक्ती, नूतनीकरण न केलेले अशांचे परवाने रद्द करण्याचे काम सुरू झाले आहे. त्याचबरोबर नवीन परवाना देताना पोलीस यंत्रणेकडूनही काटेकाेर पडताळणी केली जात आहे.
परवाना कसा काढायचा
परवाना काढताना कुटुंबातील सर्व सदस्यांचे यासाठी प्रमाणपत्र आवश्यक असते. त्याचप्रमाणे वैद्यकीय प्रमाणपत्र, पोलीस पाटील, तलाठी यांचा दाखला, पोलीस यंत्रणेकडून गुन्ह्यांची पडताळणी होते. यानंतर जिल्हाधिकारी यांच्या सुनावणीनंतरच परवाना दिला जातो.
रत्नागिरीत सर्वाधिक, गुहागरात सर्वात कमी
रत्नागिरी हे तालुका आणि जिल्ह्याचेही ठिकाण असल्याने राजकीय, बडे व्यावसायिक, धनवान व्यक्ती यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यात ५१३ परवानाधारक आहेत.
गुहागर तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ४३ तसेच लांजा आणि मंडणगड तालुक्यातही लोकसंख्या कमी असल्याने या दोन्ही तालुक्यांत ४८ शस्त्र परवानाधारक आहेत.
रत्नागिरी जिल्हा शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी शस्त्र वापरणाऱ्यांकडून तसा गैरवापर केल्याच्या घटना गेल्या दोन वर्षात घडलेल्या नाहीत.
परवाना देताना जिल्हा प्रशासन अधिक दक्ष
बरेचदा गरज नसतानाही काहीजणांना शस्त्रे वापरणे प्रतिष्ठेचे वाटते. अशांवर अंकुश आणणे गरजेचे आहे.
परवाना मिळण्यासाठी अतिशय किचकट प्रक्रिया आहे. काहीवेळा राजकीय बळाचा वापर परवाना मिळविण्यासाठी होतो.
शस्त्र परवान्याचा होणारा दुरूपयोग लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने कडक धोरण अवलंबले आहे.
पाच वर्षांत वाढले परवाने...
सध्या राजकारणातही अंतर्गत वाद विकोपाला जावू लागले आहेत. त्यामुळे प्रत्येकालाच आपल्याला आत्मसंरक्षण मिळण्याची गरज असल्याचे वाटत आहे. तसेच काही व्यक्तींकडे अमाप पैसा आल्याने मालमत्ता संरक्षणासाठी त्यांना शस्त्र बाळगण्याची गरज वाटू लागली आहे. वादातून हल्ले वाढल्याने आता आत्मसंरक्षणासाठीचे परवाने वाढले आहेत.
शस्त्र सांभाळणे कठीण
१ काहीवेळा कुटुंबामध्ये वाद होण्याची शक्यता असते. अशावेळी रागाच्या भरात आत्मसंरक्षणासाठी घेतलेल्या शस्स्त्राचा गैरवापर होण्याचा धोका असतो. त्यामुळेच परवाना देताना घरातील सर्व सदस्यांचे प्रतिज्ञापत्र घेतले जाते.
२ निवडणुका सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या असतात. अशावेळी राजकीय वैरातून शस्त्राचा वापर होण्याचा धोका राजकीय कार्यकर्त्यांकडून असतो. त्यामुळे जिल्ह्यात निवडणुका जाहीर होताच परवानधारकांना शस्त्रे प्रशासनाकडे जमा करावी लागतात.
स्टार ८७५