रत्नागिरी : ‘युटोपिया’ प्रकरणानंतर आता ‘मजिस्ट्री’ प्रकल्पात पहिल्या माळ्यावर सदनिका देतो, असे सांगून १३ लाख ४४ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी ‘युटोपिया’च्या नावाखाली चौदा कोटींची फसवणूक करणाऱ्या महेश गोविंद नवाथे (मारुती मंदिर, रत्नागिरी) व अनिल सागवेकर या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महेश नवाथे हा बांधकाम क्षेत्रात कार्यरत असताना त्याने रत्नागिरी तालुक्यातील धामणसे येथे युटोपिया आयडियल सिटी नावाचा आंतरराष्ट्रीय स्मार्ट सिटी प्रकल्प साकारण्याचे नियोजन केले होते. त्याची आधुनिक पद्धतीने जाहिरातही केली होती. या प्रकल्पासाठी सुमारे ३४० जणांकडून त्याने १४ कोटी रुपये घेतले होते; परंतु गुंतवणूकदारांना मुदतीत फ्लॅट न मिळाल्यामुळे त्यातील ५७ जणांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्याप्रकरणी पोलिसांनी फरार महेश नवाथे यास कल्याण-डोंबिवली येथून अटक केली. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. त्याचे पुन्हा एक नवीन प्रकरण उघडकीस आले आहे. रेल्वे स्टेशन, टीआरपी, कुवारबाव, रहाटाघर परिसरात मजिस्ट्री प्रकल्प उभारण्याचा महेश नवाथे याचा प्रयत्न होता. या प्रकल्पात सतीश जयसिंग पवार (वय ३०, शिवसमृद्धी, जेलरोड, रत्नागिरी) यांनी सदनिका आरक्षित केली होती. सतीश पवार यांनी २१ सप्टेंबर २०१६ रोजी या मजिस्ट्री प्रकल्पातील पहिल्या मजल्यावर सदनिका मिळावी, या उद्देशाने १३ लाख ४४ हजारांचा व्यवहार केला होता. त्याचबरोबर साठेखत करून १८ महिन्यांच्या आत काम पूर्ण करून सदनिका देतो, असे सांगितले; परंतु त्या मुदतीत त्याने कोणतेच काम पूर्ण केले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे सतीश पवार यांच्या लक्षात आले. त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठून तत्काळ तक्रार दाखल केली. पोलिसांनी महाराष्ट्र आॅनरशिप आॅफ फ्लॅट अॅक्ट कलम १३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)
‘युटोपिया’नंतर आता ‘मजिस्ट्री’
By admin | Published: November 18, 2016 11:48 PM